Inflation: वाढत्या महागाईला नियंत्रणात (Inflation) आणण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडून (RBI) आणि केंद्र सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. मात्र, आता अर्थ मंत्रालयाच्या मासिक अहवालानुसार महागाई तुमच्या खिशावर डल्ला मारणार आहे. पुढील वर्षी 2023 मध्ये महागाई कमी होण्याऐवजी वाढू शकते. डॉलरच्या तुलनेत रुपयाची (Rupee Falling) होणारी घसरण हे प्रमुख कारण ठरण्याची शक्यता आहे.
अर्थ मंत्रालयाच्या अहवालानुसार, आंतरराष्ट्रीय पातळीवर असलेल्या तणावामुळे पुरवठा साखळीवर पुन्हा दबाव वाढण्याची शक्यता आहे. यामुळे 2023 मध्ये महागाई कमी होण्याऐवजी वाढू शकते.
महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हकडून आक्रमकपणे व्याज दरात वाढ केली जात आहे. त्यामुळे भांडवलाचा ओघ कमी होण्याची शक्यता आहे. परिणामी रुपयावरील दबाव वाढू शकतो. डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण झाल्याने आयात महाग होऊ शकते. त्यामुळे महागाईतही वाढ होईल असे अहवालात म्हटले आहे. अर्थ मंत्रालयाने सांगितले की, जागतिक आर्थिक आघाडीवर निर्माण होणाऱ्या समस्यांना भारत तोंड देत आहे. भारताची आर्थिक स्थिती इतर देशांच्या तुलनेत चांगली आहे. भारताचा आर्थिक विकास दर आणि त्याच्या स्थिरतेशी संबंधित चिंता जगातील इतर देशांच्या तुलनेत कमी चिंताजनक असल्याकडेही अहवालात लक्ष वेधण्यात आले आहे. भारताचा आर्थिक विकास दर मध्यम कालावधीत 6 टक्क्यांच्यावर राहण्याचा अंदाज आहे.
जागतिक पातळीवर घडामोडी घडत असताना दुसरीकडे भारताकडे गुंतवणूकदारांचा कल वाढत आहे. भारत ही जागतिक पातळीवर महत्त्वाची बाजारपेठ आहे. बऱ्याच दिवसानंतर देशातंर्गत गुंतवणुकीतही वाढ होऊ लागली आहे. जागतिक पातळीवरील तणाव आणि पुरवठा साखळीच्या मुद्यांवर चिंता व्यक्त केली जात आहे. तरीदेखील भारत जगात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असेल असेही अर्थमंत्रालयाच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
मागील सहा महिन्यांत भारतातील किरकोळ महागाईचा दर 7.2 टक्के राहिला. जागतिक पातळीवर हाच दर 8 टक्के इतका होता. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 5.4 टक्क्यांनी घसरला आहे. जगातील सहा प्रमुख चलनांमध्ये ही घसरण 8.9 टक्के इतकी आहे. महागाई नियंत्रणासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) जुलै 2022 मध्ये अनेक पावले उचलली आहेत. त्यामुळे भांडवली प्रवाह आणखी स्थिर होण्याची अपेक्षा आहे. जेणेकरून रुपया आणखी वधारेल.
इतर महत्त्वाच्या बातम्या: