Global Recession : मागील दोन वर्षांत जगभरातील अर्थव्यवस्था ठप्प झाल्या होत्या. कोरोनाचा जोर ओसरल्यानंतर काही देशांच्या अर्थव्यवस्था आता कुठे हळू हळू पूर्वपदावर येत आहेत. अशातच चिंता करणारी बातमी समोर आली आहे. 2023 मध्ये जगातील अनेक देशांना आर्थिक मंदीचा सामना करावा लागू शकतो, असा इशारा इंटरनॅशनल मॉनिटरी फंड (International Monetary Fund)यांनी दिलाय. इंटरनॅशनल मॉनिटरी फंडाच्या इशाऱ्यामुळे चिंतेत भर पडली आहे. 


इंटरनॅशनल मॉनिटरी फंडच्या (International Monetary Fund)प्रमुख क्रिस्टालिना जॉर्जीवा (Kristalina Georgieva ) यांनी 2023 मध्ये अनेक देशांमध्ये आर्थिक मंदी येऊ शकते असा इशारा दिला आहे. त्या म्हणाल्या की, 2023 मध्ये जगभरातील एक तृतीयांश देशाला आर्थिक मंदीचा सामना करावा लागू शकतो. अशा परिस्थितीत इंटरनॅशनल मॉनिटरी फंड आपला आर्थिक अंदाज कमी करण्याची तयारीत आहे. 


इंटरनॅशनल मॉनिटरी फंड आणि वर्ल्ड बँकेच्या वार्षिक बैठकीपूर्वी क्रिस्टालिना जॉर्जीवा म्हणाल्या की, 'लोकांच्या उत्पन्नात  होणारी घट आणि वाढती महागाई याचा अर्थ अनेक देश आर्थिक मंदीचा सामना करत आहेत. पुढील वर्षी याचं प्रमाण आणखी वाढू शकते. ' चौथ्या तिमाहीसाठी आर्थिक अंदाज कमी करू होऊ शकतो, असा अंदाज क्रिस्टालिना जॉर्जीवा  यांच्या वक्तव्यावरुन वर्तवला जातोय. 


रशियानं युक्रेनवर केलेला हल्ला,  तेलाच्या वाढत्या किंमती आणि खाद्यपदार्थांच्या किंमतीमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळेच मोठ्या प्रमाणात महागाई वाढली आहे. त्या तुलनेत लोकांचं उत्पन्न वाढलेलं नाही. क्रिस्टालिना जॉर्जीवा म्हणाल्या की, जगभरातील सर्व मोठ्या अर्थव्यवस्थेची गती मंदावत आहे. अल्पावधीत परिस्थिती आणखी वाईट आणि बिकट होईल. चीनमधील प्रॉपर्टी मार्केटमधील आर्थिक जोखीम वाढतच आहे.  हे अतिशय चिंताजनक आहे. 


इंटरनॅशनल मॉनिटरी फंड (International Monetary Fund) म्हणजेच आयएमएनुसार, वाढत्या महागाईला नियंत्रणात ठेवण्यासाठी जगभरातील सेंट्रल बँकांना आपलं कठोर चलनविषयक धोरण कायम ठेवावं लागणार आहे.  खाद्यपदार्थामध्ये होत असलेल्या वारंवार वाढीचा फटका उदयोन्मुख अर्थव्यवस्थेला बसत असल्याचं दिसत आहे. त्यामुळे त्या देशांवरील आर्थिक संकट वाढत आहे. कर्जाचा बोजा वाढतच जात आहे.  क्रिस्टालिना जॉर्जीवा यांच्या मते जागतिक अर्थव्यवस्थेवर आलेलं हे संकट कायमस्वरुपी नाही. जगभरातील अनेक अर्थव्यवस्था यातून बाहेर पडतील.  


आणखी वाचा :


RuPay क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! 2,000 रुपयांपर्यंतच्या UPI व्यवहारांसाठी कोणतेही शुल्क नाही
विम्याची रक्कम नाकारणं एलआयसीला महागात; दारु प्यायल्याने मृत्यू झाला म्हणून कव्हर देण्यास दिला होता नकार