Inflation: वाढत असलेल्या महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. मंदीचे सावट गडद होत असताना नोकरकपातीची भीती असताना दुसरीकडे महागाईत घर चालवणं अधिकच आव्हानात्मक झाले आहे. 


अविनाश सिन्हा 10 वर्षांपूर्वी 2013 पासून पत्नी मेधा आणि मुलीसोबत दिल्लीत राहत आहेत. दोघे पती-पत्नी एका खासगी कंपनीत कामाला होते आणि तेव्हापासून त्यांची मुलगी शाळेत जाऊ लागली होती. 2013 मध्ये अविनाश दर महिन्याला किराणा मालावर एकूण 4000 ते 4500 रुपये खर्च करत असे. मात्र गेल्या 10 वर्षात अविनाशचे उत्पन्न वाढले असले तरी महागाईचा फटका बसला आहे. गेल्या 10 वर्षांत किराणा मालावरील खर्चात प्रचंड वाढ झाली आहे. अविनाशला आता किराणा मालासाठी महिन्याला 20,000 रुपयेही कमी पडत आहेत.


महागाईचा खिशावर दरोडा


पीठ, डाळी, तांदूळ, मोहरीचे तेल महाग झाले असून, दूध, दही, पनीरच्या दरातही या वर्षांत कमालीची वाढ झाल्याचे अविनाश यांनी सांगितले. साबण, डिटर्जंट पावडर, शॅम्पू, टूथपेस्ट या FMCG उत्पादनांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. घरगुती स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरसाठी 10 वर्षांपूर्वीच्या तुलनेत दर महिन्याला दुपटीने जास्त खर्च होत आहे. वाढत्या महागाईच्या परिणामी त्यांना घरखर्चासाठी त्यांची मुदत ठेवही तोडावी लागली. आणि या सगळ्यात मुलीच्या महागड्या शाळेच्या फीच्या महागाईने वेगळाच त्रास वाढवला असल्याचे त्यांनी म्हटले. 


अन्नधान्याच्या किमती गगनाला भिडल्या


वाढत असणाऱ्या महागाईने प्रत्येक सामान्य माणसाचे जगणे कठीण केले आहे. 10 वर्षांपूर्वी 10 किलोची पिठाची पिशवी 210 रुपयांना मिळत होती, आता ती 440 रुपयांना मिळते. म्हणजे त्याचे दर दुप्पट झाले आहेत. 10 वर्षांपूर्वी 36 ते 38 रुपये दराने मिळणारा तांदूळ आता 80 ते 90 रुपये किलोने मिळत आहे. फुल क्रीम दूध 39 रुपये प्रतिलिटर होते, ते आता 66 रुपये प्रति लिटर आहे. पूर्वी 300 रुपये किलोने मिळणारे देशी तूप आता 675 रुपये किलोने मिळत आहे. 160 ते 180 रुपये किलोने मिळणारे पनीर आता 425 ते 450 रुपये किलोने मिळत आहे. मोहरीचे तेल 2013 मध्ये 52 ते 55 रुपये प्रतिकिलो दराने उपलब्ध होते, ते आता 150 रुपये किलोने उपलब्ध आहे. तूर डाळ 2013 मध्ये 70 ते 80 रुपये प्रतिकिलो दराने उपलब्ध होती, आता ती 160 ते 170 रुपये किलोने उपलब्ध आहे.


एलपीजी, पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीने महागाईचे संकट!


घरी स्वयंपाक करण्यासाठी आवश्यक एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. 2013 मध्ये, अनुदानित घरगुती स्वयंपाकाचा गॅस 410 रुपयांना उपलब्ध होता, ज्यासाठी लोकांना आता प्रति सिलेंडर 1100 रुपये मोजावे लागतात. केवळ एलपीजीच नाही तर गेल्या 10 वर्षांत पेट्रोल डिझेलच्या किमतीही प्रचंड वाढल्या आहेत. एप्रिल 2013 मध्ये पेट्रोल 66 रुपये प्रतिलिटर दराने उपलब्ध होते, ते आता 97 रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेल 52 रुपये प्रतिलिटर दराने उपलब्ध होते. आता त्याचा दर जवळपास 90 रुपये प्रतिलिटर इतका आहे. 


गेल्या 10 वर्षांत डॉलरच्या तुलनेत रुपया खूपच कमकुवत झाला आहे. 2013 मध्ये एक डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य 54 रुपये होते, ते आता 82 रुपयांच्या पातळीवर आले आहे.


महागड्या ईएमआयमुळे बजेट बिघडले


ईएमआय घेऊन आपल्या स्वप्नातील घर विकत घेतले आहे, त्यांच्या अडचणी सर्वात जास्त वाढल्या आहेत. एका वर्षात कर्ज काढून घर खरेदी करणाऱ्यांवरील ईएमआयचा बोझा वाढला आहे. 2022 पूर्वी घर खरेदीदाराने गृहकर्ज घेतले असेल तर महागड्या EMI मुळे अशा लोकांच्या घराचे बजेट आता बिघडले आहे. उदाहरण म्हणून, एखाद्या घर खरेदीदाराने 6.50 टक्के व्याजदराने 20 वर्षांसाठी 40 लाख रुपयांचे गृहकर्ज घेतले असेल, तर त्याला 29,823 रुपयांचा ईएमआय भरावा लागेल. पण आता घर खरेदी करणाऱ्यांना त्याच गृहकर्जावर 33,568 रुपयांचा ईएमआय भरावा लागणार आहे. याचा अर्थ दर महिन्याला 3745 रुपयांनी अधिक ईएमआय भरावा लागणार आहे.


महागाईपासून तूर्तास तरी दिलासा नाही


मागील काही वर्षात महागाईचा मार चहुबाजूने बसला आहे. महागाईच्या तीव्र झळा इतक्यात तरी कमी होण्याची शक्यता नाही. अवकाळी पावसामुळे रब्बी पिकाचे नुकसान होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत गव्हाच्या किंमतीत दिलासा मिळण्याची शक्यता कमीच दिसते. तेल उत्पादक देशांची संघटना 'ओपेक प्लस'ने कच्च्या तेलाच्या उत्पादनात घट करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्या परिणामी कच्च्या तेलाच्या किंमतीतही दिलासा मिळण्याची शक्यता दिसत नाही. फेब्रुवारी 2023 मध्ये महागाईचा दर 6.40 टक्के इतका होता. हा दर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने निश्चित केलेल्या 6 टक्क्यांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे रेपो दरात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.