Pritivi Shaw : आयपीएल सुरु असतानाच क्रिकेटर पृथ्वी शॉ याच्या अडचणी वाढल्या आहेत. पृथ्वी शॉ याच्याविरोधात सपना गिलने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पृथ्वी शॉ आणि त्याचा मित्र आशिष सुरेंद्र यादव यांच्याविरोधात सपना गिल हिने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, पोलिसांनी भादवि कलम 354, 509, 324 अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. पृथ्वी शॉ आणि त्याचा मित्र आशिष सुरेंद्र यादव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे अंधेरी कोर्टाने आदेश दिले होते. 


पृथ्वी शॉ आणि त्याच्या मित्रानेविरुद्ध विनयभंग आणि बॅटने मारणे यासह अनेक प्रकरणासह सपना गिलने तक्रार दाखल केली आहे. एवढेच नाही तर ही प्रकरणे नोंदवताना सपनाने सरकारी रुग्णालयाचे वैद्यकीय प्रमाणपत्रही दिले आहे. यामध्ये तिच्यासोबत झालेल्या लैंगिक शोषणाचा उल्लेख आहे. त्याशिवाय पृथ्वी शॉ आणि त्याच्या मित्राविरोधात तक्रारीनंतरही गुन्हा दाखल न केल्यामुळे विमानतळ पोलिस स्टेशनचे अधिकारी सतीश कवनकर आणि भागवत गरंडे यांच्याविरुद्ध IPC च्या कलम 166A अंतर्गत फौजदारी तक्रार दाखल करण्यात आली आहे. 



Prithvi Shaw Sapna Gill Selfie Case Update : पृथ्वी शॉ - सपना गिल सेल्फी प्रकरण
भारतीय क्रिकेटपटू पृथ्वी शॉ सध्या आयपीएलमध्ये व्यस्त आहे. फेब्रुवारीमध्ये अभिनेत्री सपना गिलसोबतच्या वादामुळे पृथ्वी शॉ चर्चेत आला. मुंबईच्या रस्त्यावर दोघांमध्ये बाचाबाची झाली. सपना गिलने पृथ्वीच्या मित्राच्या गाडीच्या काचा फोडल्या असा आरोप आहे. त्यानंतर अभिनेत्री सपना गिलला पोलिसांनी अटक केली होती. सपना नंतर जामीनावर बाहेर आली होती. आता सपना गिल हिने याप्रकरणी कोर्टात धाव घेतली.  


Who is Sapna Gill : कोण आहे सपना गिल?
सपना गिल भोजपुरी अभिनेत्री आणि मॉडेल आहे. सपना तिचं ग्लॅमर आणि अभिनयाच्या जोरावर भोजपुरी इंडस्ट्रीमध्ये हळूहळू आपली छाप पाडण्याचा प्रयत्न करत आहे. सपना गिल सध्या 26 वर्षांची आहे. सपनाचा जन्म पंजाबची राजधानी चंदीगड येथे झाला. सपनाने 'काशी अमरनाथ' आणि 'निरहुआ चलल लंदन' या चित्रपटांमध्ये भोजपुरी सुपरस्टार अभिनेता रवि किशन आणि दिनेश लाल यादव 'निरहुआ' यांच्यासोबत चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तिच्या अद्याप एवढी प्रसिद्धी मिळाली नसली. तरी पृथ्वी शॉसोबतच्या वादामुळे सपना गिल चर्चेत आली आहे.



Prithvi Shaw Sapna Gill Selfie Case : काय आहे प्रकरण?
भारतीय क्रिकेटर पृथ्वी शॉ याचा एका तरुणीसोबत वाद झाला. मुंबईतील हॉटेल बाहेर ही घटना घडली. सेल्फी घेण्यावरुन हा वाद झाला असल्याचं समोर आलं. पृथ्वी शॉसोबत सेल्फी काढताना हाणामारी झाल्याचं यात सांगण्यात येत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, ही घटना जोगेश्वरी लिंक रोड येथील लोटसच्या पेट्रोल पंपाजवळ घडल्याची माहिती आहे. पृथ्वी शॉच्या मित्राने दिलेल्या माहितीनुसार, पृथ्वी शॉ याचा एका हॉटेलात पार्टी सुरु असताना सेल्फी काढण्यावरुन वाद झाला. त्यानंतर हॉटेलमधून शॉ दुसऱ्या कारने घराकडे निघाला होता. त्यादरम्यान त्याच्या मित्राच्या कारमध्ये तो असल्याचं संबधितांना वाटलं आणि तरुणी आणि तिच्या मित्रांनी त्या कारवर हल्ला केला.