RBI On Inflation : रशिया-युक्रेन संघर्षाचा परिणाम जगातील स्टॉक मार्केट आणि फॉरेन एक्सचेंजवर झाला आहे. वाढत्या महागाईमुळे 'रुपया'च्या अस्थिरतकडेही तज्ज्ञांनी लक्ष वेधले आहे. वाढत्या महागाईला आळा घालण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडून कोणती पावले उचलण्यात येतील याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. 


वाढती महागाई, सेमीकंडक्टरचा तुटवडा, कमोडिटीच्या उच्च किंमती, आदी अडचणींचा डोंगर उभा असताना आपल्या समोर रशिया-युक्रेन युद्धामुळे निर्माण झालेली आव्हाने आली असल्याचे 'तेजी मंदी'चे सीआयओ वैभव अग्रवाल यांनी सांगितले. जागतिक क्रूड ऑइलच्या किंमती आणि भू-राजकीय तणावाचा परिणाम आशियाई चलन बाजारावर होत आहे. भारतीय रुपयाच्या मूल्यात कमालीची उलथापालथ होत असून 24 फेब्रुवारीपासून त्याचे अवमूल्यन 2% पेक्षा जास्त झाले असल्याचे त्यांनी सांगितले. एक्सचेंज मार्केटमधील अस्थिरता थांबवण्यासाठी आरबीआयने स्थानिक चलन बाजारात 2 अब्ज डॉलर विकले असावे, असेही त्यांनी म्हटले. येत्या काही दिवसात आरबीआय बँकिंग प्रणालीतील अतिरिक्त तरलता व्यवस्थापित करण्यासाठी आणि एक्सचेंज मार्केटमध्ये डॉलरचा पुरवठा वाढवण्यासाठी खरेदी-विक्रीचा लिलाव करू शकतो अशीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. चलनवाढ नियंत्रित करण्यासाठी, आरबीआय रोखे उत्पन्न कमी करण्यासाठी तरलता कमी करेल आणि ओपन मार्केट ऑपरेशन (OMO) बाँड खरेदीसह त्याचे संतुलन करू शकते अशी माहिती अग्रवाल यांनी दिली. 


जेव्हा रिझर्व्ह बँकेला भारतीय रुपयाचे मूल्य वाढवायचे असते तेव्हा विदेशी चलन बाजारात आणते. मात्र, मागील काही काळापासून रिझर्व्ह बँकेने हे पाऊल उचलले नसल्याचे त्यांनी सांगितले. आरबीआय चलन बाजारावर बारकाईने लक्ष ठेवणार आहे.  प्रत्येक वस्तूची किंमत वाढते. पण, चलनाचे होणारे अवमूल्य रोखण्याचे मोठे आव्हान असते. या वर्षी भारतीय रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत आधीच 1.82 टक्क्यांनी कमी झाले आहे. त्यामुळे सर्वात वाईट कामगिरी करणारे आशियाई चलन झाले आहे. त्यामुळे आता आरबीआय परकीय चलन बाजारावर लक्ष ठेऊन अतिरिक्त तरलता बाहेर काढेल असा अंदाज वैभव अग्रवाल यांनी व्यक्त केला.