मुंबई : ऑक्टोबरमध्ये फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर्स (Foreign Portfolio Investors-FII) म्हणजे परकीय गुंतवणूकदारांनी भारतीय मार्केटमधून भलीमोठी रक्कम काढून घेतली आहे. ही रक्कम 12,278 कोटी रुपये इतकी मोठी आहे. 29 ऑक्टोबरपर्यंत एकूण 13,550 कोटी रुपये काढून घेण्यात आले होते. पण पुढच्या दोन दिवसांत परकीय गुंतवणूकदारांकडून बॉन्ड बाजारात 1,272 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली. 


या आधी ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये भारतीय मार्केटमधून पैसे काढून घ्यायला सुरुवात केली होती. अत्याधिक मूल्यांकनामुळे फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर्स सातत्याने आपली गुंतवणूक काढून घेत असल्याचा दावा गुंतवणूक क्षेत्रातील तज्ज्ञ व्हीके विजयकुमार यांनी केला आहे. बँका आणि वाहन उद्योगातून ही गुंतवणूक माघारी जात असल्याचं दिसून येतंय. 


या दरम्यान फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेन्टच्या माध्यमातून इंडोनेशियामध्ये 95.1 कोटी डॉलर्स, फिलिपिन्समध्ये 80 लाख तर थायलंडमध्ये 56.4 कोटी डॉलर्सची गुंतवणूक करण्यात आली आहे. तसेच तैवान आणि दक्षिण कोरियातून या काळात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक काढून घेण्यात आली. 


भारताला स्पिल ओव्हर इफ्केक्ट्स (spill-over effects) प्रभाव पडल्याचं अनेकांनी सांगितलं आहे. त्यामुळेच या एकाच महिन्यात इतक्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूक काढून घेण्यात आली असल्याचंही सांगण्यात येतंय. गेल्या तीन दिवसांपासून भारतीय शेअर बाजारामध्येही मोठी घसरण झाली असून त्यामुळे कित्येक लाखो कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे. 


शेअर मार्केट तज्ज्ञांच्या मते, या वर्षी भारतातील प्रमुख स्टॉक इंडेक्समध्ये झालेली वाढ, प्रचंड तरलता आणि किरकोळ गुंतवणूकदारांच्या वाढलेल्या संख्येमध्ये ओव्हर व्हॅल्यूएशनची चिंता वाढली आहे. मॉर्गन स्टॅनलेने भारताला 'ओव्हरवेट' या श्रेणीतून 'इक्वल वेट' या श्रेणीत टाकलं आहे.


महत्वाच्या बातम्या :