ICC T20 WC 2021, AFG vs NAM:  शेख जायद स्डेडिअमवर नामाबिया विरुद्ध खेळण्यात आलेल्या सामन्यात अफगाणिस्तानने 63 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात नाणेफेक जिंकून अफगाणिस्तानच्या संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, अफगाणिस्तानच्या संघाने 20 षटकात 5 विकेट्स गमावून 160 धावा केल्या. त्यानंतर या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या नामिबियाच्या संघाला 20 षटकात 9 विकेट्स गमावून केवळ 98 धावापर्यंत मजल मारता आली. ज्यामुळे अफगाणिस्तानच्या संघाला मोठ्या रनरेटने विजय मिळवता आला. परंतु, अफगाणिस्तानच्या विजयामुळे भारतीय संघाला उपांत्य फेरी गाठताना अडचण निर्माण होऊ शकते.

 


 

अफगाणिस्तानकडून हजरतुल्ला झाझाई (27 बॉल 33 धावा), मोहम्मद शहजाद (33 बॉल 45 धावा), रहमानउल्ला गुरबाज (8 बॉल 4 धावा), नजीबुल्ला जद्रान (11 बॉल 7 धावा), असगर अफगाण (23 बॉल 31 धावा), मोहम्मद नबी (17 बॉल 32 धावा), गुलबदिन नायब 1 बॉल 1 धाव केली. ज्यामुळे अफगाणिस्तानच्या संघाने 20 षटकात 5 विकेट्स गमावून 160 धावा केल्या. नामिबियाच्या संघाकडून रुबेन ट्रम्पेलमन आणि लोफ्टी ईटन यांनी प्रत्येकी दोन विकेट्स मिळवले. तर, जेजे स्मितला एक विकेट्स पटकवता आला आहे. 

 

या लक्ष्याचा पाठलाग करताना नामिबियाच्या संघाकडून क्रेग विल्यम्स (3 बॉल 1 धाव), मायकेल व्हॅन लिंगेन (8 बॉल 11 धावा), जॅन निकोल लोफ्टी-ईटन (16 बॉल 14 धावा) झेन ग्रीन (7 बॉल 1 धाव), डेव्हिड विसे (30 बॉल 26 धावा), जेजे स्मित (3 बॉल 0), जॅन फ्रायलिंक (14 बॉल 6 धावा) गेरहार्ड इरास्मस (14 बॉल 12 धावा), पिक्की या फ्रान्स 5 बॉल 3 धावा), रुबेन ट्रम्पेलमन (9 बॉल 12 धावा), बर्नार्ड शॉल्ट्झने 11 बॉल 6 धावा केल्या. ज्यामुळे नामिबियाच्या संघाला 9 विकेट्स गमावून केवळ 98 धावापर्यंत मजल मारता आली आहे. अफगाणिस्तानच्या संघाकडून नवीन-उल-हक आणि हमीद हसन यांनी प्रत्येकी 3-3 विकेट्स घेतले आहे. तर, गुलाबदीन नैबला दोन विकेट्स आणि राशिद खानला 1 विकेट्स मिळवता आली.

 

अफगाणिस्तानच्या विजयामुळे भारत आणि न्यूझीलंडच्या चिंतेत भर पडली आहे. अफगाणिस्तानचा रनरेट पाहता भारत आणि न्यूझीलंडला अफगाणिस्तानला पराभूत करणे गरजेचे आहे. अफगाणिस्तानचा संघ 4 गुणांसह +3.097 इतका रनरेट आहे. भारताचा रनरेट -0.973, तर न्यूझीलंडचा रनरेट -0.532 इतकी आहे.