नवी दिल्ली : मागील काही वर्षात भारतीय रेल्वेने (Indian Railway Income) उत्पन्न वाढीसाठी वेगवेगळे मार्ग अवलंबण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये तिकीट दरवाढीपासून ते इतर उपाययोजनांचाही समावेश आहे. रेल्वेतून प्रवास करणाऱ्या लहान मुलांसाठी असलेल्या एक नियमात बदल करून रेल्वेने चांगले उत्पन्न मिळवले आहे. मागील 7 वर्षात रेल्वेने 2800 कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे. माहिती अधिकारातंर्गत ही बाब समोर आली आहे.
एका वृत्तसंकेत स्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, 'सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टीम'ने माहितीच्या अधिकाराखाली उत्तर दिले. फक्त 2022-23 या आर्थिक वर्षातच नियमांमधील बदलांमुळे रेल्वेला 560 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. लहान मुलांच्या प्रवास दराशी संबंधित नियमात बदल झाल्याने रेल्वेला फायदा झाला आहे.
रेल्वेने केला होता हा बदल
31 मार्च 2016 रोजी भारतीय रेल्वेने पाच वर्ष ते 12 वर्षापर्यंतच्या बालक प्रवाशांना वेगळा बर्थ हवा असल्यास पूर्ण भाडे वसूल करण्याचा निर्णय घेतला होता. रेल्वेने हा नियम 21 एप्रिल 2016 पासून लागू केला. माहिती अधिकारातंर्गत मिळालेल्या माहितीनुसार, लहान मुलांशी संबंधित असलेल्या या नियमांमध्ये बदल केल्याने भारतीय रेल्वेने मागील सात वर्षात 2800 कोटींची कमाई केली आहे.
पूर्वी नियम काय होता?
यापूर्वी रेल्वे 5 ते 12 वर्षे वयोगटातील मुलांना अर्धे भाडे आकारून आरक्षित बर्थ देत असे. दुसऱ्या पर्यायांतर्गत, जर मुलाने स्वतंत्र बर्थ घेण्याऐवजी सोबतच्या प्रौढ व्यक्तीच्या बर्थवर प्रवास केला, तर त्याला अर्धे भाडे द्यावे लागेल. CRIS ने 2016-17 ते 2022-23 या आर्थिक वर्षातील मुलांच्या दोन श्रेणींसाठी भाडे पर्यायांवर आधारित डेटा दिला आहे. CRIS ने आरटीआय अंतर्गत मागवलेल्या माहितीत म्हटले आहे की, गेल्या सात वर्षांत 3.6 कोटींहून अधिक मुलांनी आरक्षित सीट किंवा बर्थचा पर्याय न निवडता अर्धे भाडे देऊन प्रवास केला. दुसरीकडे, 10 कोटींहून अधिक मुलांनी स्वतंत्र बर्थ किंवा आसन निवडले आणि संपूर्ण भाडे दिले.
विनातिकीट प्रवाशांमुळे रेल्वेची बंपर कमाई
रेल्वेने 2022-23 मध्ये चुकीच्या तिकिटांसह किंवा विना तिकीट प्रवास करणाऱ्या 3.6 कोटी प्रवाशांना पकडले. वर्ष 2021-22 च्या तुलनेत अशा प्रवाशांची संख्या एक कोटींहून अधिक वाढली आहे. माहितीच्या अधिकाराखाली (RTI) मिळालेल्या उत्तरात ही माहिती समोर आली आहे. आरटीआयच्या उत्तरानुसार, 2019-2020 मध्ये 1.10 कोटी लोक विना तिकीट किंवा चुकीच्या तिकिटांसह प्रवास करताना पकडले गेले, तर 2021-22 मध्ये ही संख्या 2.7 कोटी आणि 2022-23 मध्ये 3.6 कोटी इतकी झाली. तर 2020-21 मध्ये कोविड-19 महासाथीच्या आजाराची लाट पसरली होती. त्या वर्षी हा आकडा 32.56 लाख होता.
मध्य प्रदेशातील सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर गौर यांच्या आरटीआय प्रश्नाच्या (RTI) उत्तरात, रेल्वेने गेल्या तीन वर्षांत अशा प्रवाशांकडून वसूल केलेल्या दंडाच्या रक्कमेची माहिती दिली आहे. रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, रेल्वेने चुकीच्या तिकिटावर प्रवास करणाऱ्या, विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये 152 कोटी रुपये, 2021-22 मध्ये 1,574.73 कोटी रुपये आणि 2022-23 मध्ये 2,260.05 कोटी रुपये दंड वसूल केला आहे.