India Per Capita Income:  भारत जगातील पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. येत्या काही वर्षात भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था म्हणून स्थान मिळवण्याचे स्वप्न पाहत आहोत. मात्र, त्याच वेळी देशातील परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आणून देणारी आकडेवारी समोर आली आहे. दरडोई उत्पन्नाच्या ( Per Capita Income) बाबत भारत हा आफ्रिकेतील गरीब देशांच्या यादीत येत असल्याचे समोर आले आहे. आफ्रिका खंडातील अंगोला सारख्या देशाचेही दरडोई उत्पन्न हे भारतापेक्षा अधिक आहे. जगातील 197 देशांमध्ये दरडोई उत्पन्नाच्या यादीत भारत 142 व्या स्थानांवर आहे. 


आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संघटनेने जारी केलेल्या आकडेवारीत ही माहिती समोर आली आहे. जगातील मोठी अर्थव्यवस्था समजल्या जाणाऱ्या देशांमध्ये भारताचे दरडोई उत्पन्न अतिशय कमी आहे. अमेरिकेसोबत तुलना करता एका भारतीयाचे दरडोई उत्पन्न हे अमेरिकन नागरिकांपेक्षा 31 पटीने कमी आहे. 


अमेरिकेत दरडोई वार्षिक उत्पन्न 80,035 डॉलर इतके आहे. तर, भारतीयाचे दरडोई वार्षिक उत्पन्न 2601 डॉलर इतके आहे. अमेरिकेचे दरडोई उत्पन्न हे 31 पट अधिक आहे. 


जर्मनी आणि कॅनडाचे दरडोई उत्पन्न हे भारताच्या तुलनेत 20 पट अधिक आहे. ब्रिटनचे 18 पट अधिक आहे. फ्रान्सच्या नागरिकाचे प्रति व्यक्ती उत्पन्न 17 पटीने अधिक आहे. जपान आणि इटलीचे प्रति व्यक्ती दरडोई उत्पन्न सरासरी 14 पटीने अधिक आहे. तर, चीनच्या तुलनेत भारताचे दरडोई उत्पन्न 5 पटीने अधिक आहे. 


गरीब देशांची स्थिती अधिक चांगली


आर्थिकदृष्ट्या अतिशय मजबूत आणि समृद्ध देशांमधील दरडोई उत्पन्न भारतापेक्षा अधिक आहे, हे आकडेवारीतून दिसून आले आहे. मात्र, धक्कादायक बाब म्हणजे जगातील आणि आफ्रिकेतील गरीब देशांच्या तुलनेतही भारताचे दरडोई उत्पन्न कमी आहे. अंगोला, वनौतू आणि साओ टोम प्रिन्सिप या छोट्या देशांचे दरडोई उत्पन्नही भारतापेक्षा जास्त आहे. अंगोलाचे दरडोई उत्पन्न 3205 डॉलर, वानुआतुचे 3188 डॉलर, साओ टोम प्रिन्सिपचे 2696 डॉलर आणि आयव्हरी कोस्टचे 2646 डॉलर आहे.


8 वर्षात दरडोई उत्पन्न दुप्पट


राष्ट्रीय सर्वेक्षण संघटनेच्या (NSO) आकडेवारीनुसार, भारताचे दरडोई उत्पन्न 1,72,000 रुपये झाले आहे. 2014-15 च्या तुलनेत मोदी सरकारच्या कार्यकाळात दरडोई उत्पन्न दुप्पट झाले आहे. 2014-55 मध्ये दरडोई उत्पन्न 86,647 रुपये होते. म्हणजेच या काळात वैयक्तिक उत्पन्नात जवळपास 100 टक्के वाढ झाली आहे.


देशातील वाढती आर्थिक विषमता


प्रत्येक भारतीयाच्या सरासरी उत्पन्नाला दरडोई उत्पन्न म्हणतात. पण भारताचे दरडोई उत्पन्नही देशातील वाढती असमानता दर्शवते. ऑक्सफॅम इंटरनॅशनलच्या अहवालानुसार, देशातील 10 टक्के लोकसंख्येकडे देशातील 77 टक्के संपत्ती आहे. या आकडेवारीवरून देशात आर्थिक विषमतेची दरी किती मोठी झाली आहे, याचा अंदाज येऊ शकतो. मागील काही वर्षांपासून संपत्तीचे केंद्रीकरण आणि आर्थिक विषमतेचा मुद्दा सातत्याने चर्चेत येतो.