Paisa Jhala Motha : "युक्रेनमधून आयर्न आणि खनिज पुरवठा होतो. युद्धपरिस्थितीमुळे या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे आगामी काळात घरांच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे. परंतु, त्या जास्त वाढणार नाहीत, अशी माहिती ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ चंद्रशेखर टिळक (Chandrashekhar Tilak) यांनी एबीपी माझाच्या (ABP Majha) 'पैसा झाला मोठा' या कार्यक्रमात बोलताना दिली आहे.
गेल्या तीन आठवड्यांपासून युक्रेन आणि रशियामध्ये युद्ध सुरू आहे. या युद्धाचा जगभर परिणाम झाला आहे. कच्च्या तेलासह अनेक गोष्टींच्या किमती वाढल्या आहेत. बांधकाम क्षेत्रावरही या युद्धाचा मोठा परिणाम झाला आहे. बांधकामाच्या सर्वच साहित्याच्या किंमती वाढल्या असून स्टीलसह कच्च्या मालाच्या भावातही 40 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे आगामी काळात घरांच्या किंमती गगणाला भिडण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. परंतु, घरांच्या किंमतींमध्ये वाढ होईल. परंतु, ही वाढ जास्त प्रमाणात नसेल असे चंद्रशेखर टिळक यांनी सांगितले आहे.
चंद्रशेखर टिळक म्हणाले,"युक्रेन-रशिया युद्धामुळे बांधकामासाठी लागणारे साहित्य महाग झाले आहे. परंतु, अलिकडे जुन्या बांधकामांच्या पुनर्बांधनीला मोठ्या प्रमाणात परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे पुरवठ्यामध्ये वाढ झाली आहे. ही पुरवठ्याची वाढ थोड्या काळासाठी असेल. असे असले तरी गेल्या दोन वर्षांतील कोरोना परिस्थितीमुळे घरांच्या खरेदीत म्हणावी तेवढी वाढ झालेली नाही. त्यामुळे आगामी काळत घरांच्या किंमतींमध्ये थोड्या प्रमाणात वाढ होईल."
घरांच्या किमतींमध्ये थोडीफार वाढ होणार असली तरी आगामी काळात सोन्याच्या किमतींमध्ये जास्त बदल होणार नाहीत, अशीही माहिती चंद्रशेखर टिळक यांनी यावेळी दिली.
महत्वाच्या बातम्या