Hinduja Group: आयकर विभागाने (Income Tax Department) बुधवारी हिंदुजा ग्रुपच्या (Hinduja Group) हिंदुजा ग्लोबल सोल्युशन्सच्या मुंबई आणि इतर काही शहरांतील कार्यालयांची झडती घेतली. अधिकृत सूत्रांनी ही माहिती दिली. करचुकवेगिरीच्या तपासाचा भाग म्हणून ही शोधमोहीम राबविण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले. कंपनीच्या मुंबई आणि इतर काही शहरांमध्ये असलेल्या कार्यालयांची झडती घेण्यात आली. शोध मोहिमेशी संबंधित प्राप्तिकर कायद्यांतर्गत, अशी कारवाई केवळ कार्यालयाच्या आवारातच केली जाऊ शकते.
हिंदुजा समूहाकडे इंडसइंड बँक, हिंदुजा लेलँड फायनान्स आणि हिंदुजा बँक (स्वित्झर्लंड) यांची मालकी आहे. समूह आपल्या व्यवसायात वैविध्य आणत आहे आणि नवीन तंत्रज्ञान, डिजिटल आणि फिनटेक क्षेत्रांमध्ये प्रगतीच्या नवीन टप्प्यासह BFSI क्षेत्रात संपूर्ण ऑफर मिळवण्यासाठी अधिग्रहणाद्वारे अंतर भरून काढण्याचा प्रयत्न करत आहे.
'पीटीआय' या वृत्तसंस्थेने हिंदुजा समुहाला आयकर विभागाच्या कारवाईबाबत प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी ई-मेल पाठवला. मात्र, समुहाकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राप्तिकर विभागाची कारवाई 'जनरल अँटी टॅक्स इव्हॅशन रुल्स'च्या (GAAR) तरतुदींशीही संबंधित आहे. हिंदुजा ग्लोबल सोल्युशन्स (HGS) स्ट्रॅटेजिक कन्सल्टिंग, डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन, आयटी सिस्टम इंटिग्रेशन सेवा पुरवते.
अनेक देशांमध्ये व्यवसाय
हिंदुजा समूहाचा व्यवसाय 38 हून अधिक देशांमध्ये पसरलेला आहे. कंपनी ट्रक-बस, बँकिंग, पॉवर, केबल-टीव्ही आणि मनोरंजन या व्यवसायात गुंतलेली आहे. अशोक लेलँड, गल्फ ऑइल, हिंदुजा बँक स्वित्झर्लंड, इंडसइंड बँक, हिंदुजा ग्लोबल सोल्युशन्स, हिंदुजा टीएमटी, हिंदुजा व्हेंचर्स, इंडसइंड मीडिया आणि कम्युनिकेशन्स यांसारख्या कंपन्या या समूहाचा भाग आहेत.
हिंदुजा समुहाची संपत्ती किती?
फोर्ब्सच्या यादीनुसार, हिंदुजा समूहाची 2022 मध्ये 14 अब्ज डॉलर (12,55,03,36,00,000 रुपये) संपत्ती आहे. श्रीचंद हिंदुजा हे संपूर्ण समुहाचे अध्यक्ष होते. गोपीचंद हिंदुजा हे सहअध्यक्ष आहेत. तिसरा भाऊ प्रकाश हे युरोपमधील हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष आहेत. तर अशोक भारतातील हिंदुजा समूहाचे अध्यक्ष आहेत.