मुंबई : म्हाडाच्या पुणे (Pune Mhada) घरांसाठीची सोडत अखेर जाहीर झाली आहे. येत्या 05 डिसेंबर 2023 रोजी संगणकीय सोडतीत विजेत्यांची नावं घोषित केली जातील. गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळातर्फे पुणे, पिंपरी चिंचवड, कोल्हापूर, सोलापूर, सांगली येथील विविध गृहनिर्माण योजनेतील 5863 घरांसाठी लॉटरी जाहीर झाली होती.  त्याची संगणकीय सोडत  पुणे जिल्हा परिषद सभागृह येथे 05 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 9 वाजता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री  अजित पवार, गृहनिर्माण मंत्री  अतुल सावे यांच्या उपस्थितीत काढण्यात येणार आहे.
 
पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे दि. 05 सप्टेंबर, 2023 रोजी सोडतीसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी आणि अर्ज भरणा प्रक्रियेचा शुभारंभ करण्यात आला. या सोडतीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून 5863 सदनिकांसाठी सुमारे 60 हजार अर्ज प्राप्त झाले . अधिवास प्रमाणपत्र व इतर अनुषंगिक कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी वाढीव मुदत मिळण्यासाठी नागरिकांनी केलेल्या मागणीनुसार व नागरिकांना सुविधा मिळावी यासाठी मंडळातर्फे सोडतीसाठी दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली. 


पश्चिम महाराष्ट्रात म्हाडाची घरे 


 म्हाडा पुणे मंडळाच्या सोडतीत पुणे जिल्ह्यातील 5425 सदनिका, सोलापूर जिल्ह्यातील 69 सदनिका, सांगली जिल्ह्यातील 32 सदनिका व कोल्हापूर जिल्ह्यातील 337 सदनिका विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या सोडतीत म्हाडा गृहनिर्माण योजनेतील 403 सदनिका, प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत 431 सदनिका, 20 टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत 2584 सदनिका व प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजनेअंतर्गत 2445 सदनिका विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.


'म्हाडा'चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजीव जयस्वाल, पुणे मंडळाचे मुख्य अधिकारी श्री. अशोक पाटील आदी या सोडतीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.  


म्हाडाच्या घरांच्या किमती कमी होणार? 


म्हाडा लवकरच घरांच्या किमती कमी करणार आहे.अनेक दिवस म्हाडा लॉटरीतील पडून असलेल्या घरांच्या किंमती कमी होणार असल्याचं गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी काही दिवसापूर्वीच सांगितलं होतं. म्हाडाच्या सुमारे 11 हजार घरांच्या किंमती कमी होणार आहेत. संबंधित घरांचं वीज बिल, पाणी पट्टी भरावी लागत असल्यानं म्हाडाच्या वतीनं हा निर्णय घेण्यात आल्याचंही यावेळी मंत्री सावे यांनी सांगितलं. संबंधित घरांचं वीज बिल, पाणी पट्टी यामध्ये म्हाडाचा बराच पैसा खर्च होतो. अशा तब्बल 11 हजार घरांची कमी किमती करुन पुन्हा विक्री करण्यात येणार असून नुकसान टाळत महसूल वाढीसाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी सांगितलं.  


संबंधित बातम्या 


MHADA Lottery: आनंदाची बातमी! म्हाडाच्या 11 हजार घरांच्या किमती कमी होणार; गृहनिर्माण मंत्री अतुल सावेंची घोषणा


Mhada Lottery : म्हाडाच्या 11 हजार घरांच्या किंमती कमी होणार, गृहनिर्माण मंत्री अतुल सावेंची घोषणा