मुंबई: एचडीएफसी आणि एचडीएफसी बॅंकेचं विलिनीकरण (HDFC-HDFC Bank merger) 1 जुलैपासून प्रभावी होणार आहे. अशात एचडीएफसीचे अध्यक्ष दीपक पारेख (Deepak Parekh) यांनी राजीनामा देत निवृत्ती जाहीर केली आहे. आज एचडीएफसीच्या बोर्डाची शेवटची बैठक पार पडली, यावेळी कंपनीकडून त्यांना निरोप देण्यात आला.  


याआधी दीपक पारेख यांनी आपल्या शेअर होल्डर्सना शेवटचं भावनिक पत्र लिहिलं आहे. त्यात आपल्या जबाबदारीतून मुक्त होण्याची हिच वेळ असून पायउतार होत असल्याचं सांगत कंपनीची चांगली वाटचाल असेल असा विश्वास व्यक्त केला. भारतातील सर्वसामान्यांना गृहकर्ज देण्याचे श्रेय दीपक पारेख यांना जाते, दीपक पारेख यांनी गृहकर्ज देण्याची प्रक्रिया सोपी करत सर्वसामान्यांना कर्ज उपलब्ध करुन दिली. 


दीपक पारेख यांनी विश्वास व्यक्त केला की एचडीएफसी बँकेने मालकी ताब्यात घेतल्याने ती आणि समूह कंपन्यांमधील समन्वय अधिक दृढ होईल. समभागधारकांना दिलेल्या शेवटच्या संदेशात पारेख म्हणाले की, एचडीएफसी बँकेच्या मुख्य व्यवसायामध्ये गृहकर्जांचा समावेश असेल. एचडीएफसी बँकेच्या विस्तीर्ण वितरण नेटवर्कचा गृहकर्ज आणि समूह कंपन्यांसाठी चांगल्या प्रकारे उपयोग केला जाईल.


सर्वात मोठा धोका म्हणजे स्थिती कायम राखणे


दीपक पारेख म्हणाले, 'भविष्यात काय होईल हे येणारा काळच सांगेल. परंतु आज आर्थिक संस्थांना सर्वात मोठी जोखीम आहे ती स्थिती कायम राखणे. यासोबतच भूतकाळात केलेले चांगले काम भविष्यातही कायम राहील, असा विश्वासही कायम ठेवावा लागेल. बदलासाठी धैर्य आवश्यक आहे, कारण तो एखाद्याला कम्फर्ट झोनमधून बाहेर काढतो.


निवृत्त होण्याची वेळ आली आहे


दीपक पारेख म्हणाले की, भविष्यासाठी आशा आणि अपेक्षा ठेऊन निवृत्त होण्याची वेळ आली आहे. एचडीएफसीच्या भागधारकांशी हा माझा शेवटचा संवाद असला तरी आता विकास आणि समृद्धीच्या रोमांचक भविष्याची वाट पाहत आहोत.


एचडीएफसी आणि एचडीएफसी बॅंकेचं विलिनीकरण झाल्याने एचडीएफसी बॅंक आता जगातील चौथ्या क्रमांकाची मोठी वित्तीय संस्था असेल. जेपी मॉर्गन, चीनची आयसीबीसी, बॅंक ऑफ अमेरिकानंतर एचडीएफसी क्रमांक लागणार आहे. 


विलिनीकरणानंतर संपूर्णपणे संचालक मंडळानं ठरवलेल्या रोडमॅपवर ही वित्तीय संस्था यापुढे काम करताना दिसेल. दोन्ही संस्थेची एकत्रित मालमत्ता सुमारे 18 लाख कोटी रुपयांच्या जवळपास आहे. भारताच्या कॉर्पोरेट इतिहासातील अशा प्रकारचा सर्वात मोठा करार म्हणून ओळखला जातो. 


एचडीएफसी 13 जुलैपासून 'एचडीएफसी बँक' नावाने आपले शेअर ट्रेड करणार आहे. एचडीएफसी बँकेने गेल्या वर्षी 4 एप्रिल रोजी एचडीएफसीचे अधिग्रहण करण्याचं जाहीर केलं होतं.