मुंबई: साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक असणाऱ्या गुढीपाडव्याच्या सणाला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. मराठी संस्कृतीत गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोने खरेदी करण्याची परंपरा आहे. मात्र, यंदा सोन्याचा दर (Gold Price) अक्षरश: गगनाला भिडला आहे. गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला सोन्याच्या किंमतीने नवा उच्चांक गाठला आहे. सोमवारी संध्याकाळी बाजार बंद होताना सोन्याचा दर प्रतितोळा 73400 रुपये इतका नोंदवण्यात आला. त्यामुळे उद्या गुढीपाडवा (Gudi Padwa 2024) असल्याने बाजार उघडताच सोन्याचा दर 75 हजारांचा टप्पा ओलांडणार का,याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. (Gold Rates on Gudi Padwa in Mumbai)


गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोने खरेदीसाठी झुंबड उडत असल्याने यादिवशी साहजिकच सोन्याला जास्त मागणी असते. त्यामुळे गुढीपाडव्याला सोन्याच्या किंमतीमध्ये वाढ होते, हा नेहमीचा शिरस्ता आहे. परिणामी मंगळवारी वायदे बाजार उघडताच सोन्याचे भाव किती उसळी घेणार, याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. आगामी काळ हा लग्नसराईचा असल्याने सोन्याचा दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. तर चांदीच्या दरातही वाढ होण्याची शक्यता आहे. सोमवारी संध्याकाळी बाजार बंद होताना चांदीचा भाव प्रति किलो ८३ हजार ९०० रुपये इतका नोंदवण्यात आला. उद्या चांदीचा दरही वाढण्याची शक्यता आहे.


सोनं रोजच खातंय भाव! पण का? सोन्याचा दर कसा ठरवतात? समजून घ्या सोप्या शब्दांत!


सोन्याचा भाव इतक्या झपाट्याने का वाढतोय?


गेल्या काही काळात सोन्याच्या किंमतीमध्ये झपाट्याने वाढ होत असल्याचे निदर्शनास आले आहे. अमेरिकेची मध्यवर्ती बँक असलेल्या फेडरल रिझर्व्हने व्याजदरात कपात करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे जगभरातील गुंतवणुकदारांकडून सोन्यामधील गुंतवणूक वाढवली जात आहे. परिणामी जागतिक स्तरावर सोन्याची मागणी वाढली आहे. याचा परिणाम भारतामध्येही दिसून येत आहे.


रशिया-युक्रेन युद्ध, इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्ष यामुळे जागतिक अर्थकारणात अस्थिरतेचे वारे वाहत आहेत. अस्थिरतेच्या काळात गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय असलेल्या सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी अधिक प्राधान्य देत आहेत. हा घटकही सोन्याची किंमत वाढण्यास कारणीभूत ठरत आहे. 


आणखी वाचा


सोने तारण ठेवून कर्ज घ्यावं का? नेमकी काय काळजी घ्यावी? सोप्या भाषेत जाणून घ्या RBI चे नियम!