Rajesh Kshirsagar on Satej Patil : कार्यकर्ता सोडून वाड्यावर कधी उमेदवारी गेली हे काँग्रेस कार्यकर्त्यांना सुद्धा कळालं नाही. सतेज पाटील यांच्यासारख्या नेत्यांनी आमदार जयश्री जाधव यांच्यावर व्यावसायिक दबाव होता, असा आरोप करणं चुकीचं असल्याचं शिंदे गटाचे नेते माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी म्हटलं आहे. आमदार सतेज पाटील यांच्यावर होत असलेल्या आरोपांची चौकशीची जरी आम्ही मागणी केली तर असती तर खूप गोष्टी बाहेर आले असत्या असंही त्यांनी म्हटलं आहे. आम्ही निवडणूक वैयक्तिक पातळीवर नेणार नाही, त्यांनी देखील नेऊ नये, असे त्यांनी सांगितले. आमदार जयश्री जाधवांच्या पक्षप्रवेशावरून सतेज पाटील यांनी टीकास्त्र सोडल्यानंतर राजेश क्षीरसागर यांनी पत्रकार परिषद घेत पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडले.
सतेज पाटील यांचे अनेक सेनापती आमच्या संपर्कात
राजेश क्षीरसागर म्हणाले की, मुख्यमंत्री शिंदे यांची उंची मोठी आहे, त्यांच्यावर सतेज पाटील यांनी बोलू नये. मुख्यमंत्री पुन्हा एकदा शिंदे होणार आहेत असेही ते यावेळी म्हणाले. सतेज पाटील यांचे अनेक सेनापती आमच्या संपर्कात असल्याचा दावा सुद्धा राजेश क्षीरसागर यांनी केला. आमदार जयश्री जाधव यांच्या संदर्भात बोलताना क्षीरसागर म्हणाले की काँग्रेसच्या विद्यमान आमदार जयश्री जाधव यांना गेल्या काही दिवसांमध्ये अपमानास्पद वागणूक मिळाली, म्हणूनच त्यांनी शिंदे गटांमध्ये प्रवेश केला. शिंदे यांनी जयश्री जाधव यांची शिवसेना उपनेतेपदी नियुक्ती केल्याचे क्षीरसागर म्हणाले. महिला सबलीकरण करण्यासाठी जयश्री जाधव यांना रोल माॅडेल करून ते राज्यभर वापरले जावे असा निर्णय झाल्याचेही त्यांनी सांगितले. पुढील काळामध्ये जाधव यांना न्याय दिला जाईल असेही ते म्हणाले.
काँग्रेसच्या पायाखालची वाळू घसरली
आमच्या नाहीतर काँग्रेसच्या पायाखालची वाळू घसरली असून म्हणूनच रात्रीत उमेदवार बदलण्याची वेळ काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांवर आल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केला. आमच्यावर बिनबुडाचा आरोप केल्याचेही त्यांनी म्हटले आहे. त्यांनी सांगितले की, स्थानिक नेत्यांनी काल कोल्हापूरच्या रस्त्यांवरून महायुतीवर टीका केली. मला त्यांची कीव येते कारण मंत्री, पालकमंत्री असताना सुद्धा यांना निधी आणता आला नाही. विकास करता आला नाही. 100 कोटींच्या रस्त्यांवर टीका करून संभ्रम पसरवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. राजकारणासाठी असा संभ्रम पसरवण्याचा मी निषेध करतो. निवडणूक वेगळ्या दिशेने नेण्याचा प्रयत्न विरोधकांचा आहे. दोनदोन वेळा मंत्री, पालकमंत्री झालेल्या सतेज पाटील यांच्या पोटात आता दुखू लागलं आहे. कारण त्यांना अपेक्षित विकास करता आला नाही. आपल्या संस्था मोठ्या करायच्या एवढंच काम त्यांनी केल्याची टीका त्यांनी केली.
पक्षप्रवेश करण्यामध्ये आमचा काही रोल नाही
दरम्यान, जाधव यांच्या शिंदे गटात प्रवेश करण्यामध्ये आमचा काही रोल नसल्याचा सुद्धा क्षीरसागर यांनी म्हटलं आहे. त्यांचं काँग्रेस पक्षामध्ये खच्चीकरण केलं जात होतं. पोस्टरवरून सुद्धा त्यांचा फोटो काढून टाकण्यात आला. रात्रीत उमेदवार बदलणे षड्यंत्र आहे असं त्यांना वाटल्याचं क्षीरसागर म्हणाले. उमेदवार निवड प्रक्रियेमध्ये विश्वासत न घेतल्याने त्या दुखावल्या होत्या असेही त्यांनी सांगितले. जयश्री जाधव यांच्या पक्षप्रवेशाने महायुतीला बळ मिळालं असल्याचे त्यांनी सांगितले.
इतर महत्वाच्या बातम्या