Paisa Jhala Motha : "गेल्या सात ते आठ वर्षात बांधकाम क्षेत्रातून जास्त परतावा मिळाला नाही. शिवाय भारतात घरांकडे गुंतवणूक म्हणून लोक पाहत नाहीत. येणाऱ्या काळात घरांच्या किंमती कमी होणार नाहीत. परंतु, त्या जास्त वाढणारही नाहीत. त्यामुळे अनेकांचं स्वत:चं घर असावं असं स्वप्न असतं. त्यामुळे घर खरेदी करणाऱ्या लोकांसाठी सध्याची परिस्थीती म्हणजे मोठी संधी आहे, अशी माहिती गुंतवणूक सल्लागार निखील नाईक यांनी एबीपी माझाच्या 'पैसा झाला मोठा' या कार्यक्रमात दिली. 


गेल्या महिन्याभरापासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरु आहे. या युद्धामुळे स्टीलसह कच्च्या मालाच्या पुरवठ्यावर होणारा परिणाम कायम आहे. त्यामुळे घरांच्या किंमतींमध्ये वाढ होण्याची शक्यता होती. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये संभ्रमावस्था आहे का? या प्रश्नाचे उत्तर देताना निखील नाईक यांनी ही माहिती दीली आहे.


एबीपी माझाच्या पैसा झाला मोठा या कार्यक्रमात 'नव्या आर्थिक वर्षात  वाटचाल कशी करावी?' या विषयावर बोलताना निखील नाईक यांनी अनेक प्रश्नांची उत्तर दिली. ते म्हणाले, "म्युच्युअल फंडधारकांमध्ये गेल्या वर्षभरात उत्साह आहे. एसबीआय म्युच्युअल फंडात 30 लाख नव्या गुंतवणूकदारांची भर पडली आहे. हा विश्वास असाच कायम राहिला तर गुंतवणूकदारांना त्याचा चांगला फायदा होऊ शकतो. लॉकडाऊनमध्ये लोक घरी होते, त्यामुळे त्यांची बचत वाढली. अनेक लोक लॉकडाऊनमध्ये वर्क फ्रॉम होम करत होते. त्यामुळे त्यांच्या उत्पन्नावर त्याचा परिणाम झाला. जगतिक बॅंकांनी व्याजदर कमी केल्यामुळे व्याजदरात सातत्याने घट होत होती. त्यामुळे शेअर बाजाराशिवाय गुंतवणुकीला दुसरा पर्याय नाही, असे गुंतवणूकदारांना वाटत होते. त्यामुळे त्यांनी मोठ्या प्रमाणात शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली. गुंतवणूकदारांमधील हाच विश्वास दिर्घ काळासाठी टिकून राहिला पाहिजे."


"गेल्या महिन्याभरापासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. त्यामुळे जगभरात महागाई वाढत आहे. या सर्व गोष्टींचा शेअर बाजारावर परिणाम होत आहे. युद्धाच्या महिन्याभरातनंतरही शेअरबाजारात चढउतार कायम आहे. गुंतवणूकदरांच्या मनातील धाकधूक आतातरी संपणार का? यावर बोलताना निखील नाईक म्हणाले, "कोरोनासारख्या महामारीमुळे आणि आणखी इतर कारणांमुळे शेअर बाजार कोसळेल अशी परिस्थिती होती. शिवाय परदेशी गुंतवणूकदारांनी आपले पैसे काढून घेतले होते. परंतु, शेअर बाजार स्थिर राहत होता. गेल्या महिन्यासह या पूर्वीही रिटेल गुंतवणूकदारांचा ओघ सुरू आहे, तोपर्यंत शेअर बाजारात करेक्शन येईल असे वाटत नाही."


गुढीपाडव्याआधी सोनं खरेदी वाढणार की घटणार?
सोन्याचा दर सध्या 53 हजार 550 च्या आसपास आहे.  गुढीपाडव्याआधी सोनं खरेदी वाढणार की घटणार? यावर बोलताना निखील नाईक म्हणाले, "सोन्याचा भाव हा महागाईशी निगडीत आहेत. त्यामुळे महागाई वाढली तर सोन्याचे दर वाढतील."