Gold Silver Price Today : सोन्याच्या दरात पुन्हा वाढ सुरु, MCX वर चांदी महागली, दरवाढ कायम राहणार? आंतरराष्ट्रीय बाजारात काय घडतंय?
Gold Silver Rate Today : सोने आणि चांदीच्या दरात वाढ पुन्हा सुरु झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर चांदीचे दर वाढले आहेत.

Gold Silver Price Today नवी दिल्ली : सोने आणि चांदीच्या दरात देशांतर्गत बाजारात सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर ऑक्टोबर सीरिजच्या सोन्याच्या दरात 0.42 टक्क्यांची वाढ झाली असून सोने 153461 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले आहेत. एमसीएक्सवर चांदीच्या डिसेंबरच्या वायद्याचे दर देखील वाढले आहेत. एक किलो चांदीचा दर 0.67 टक्क्यांनी वाढून 240615 रुपयांवर पोहोचला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात तेजी पाहायला मिळाली आहे. यूएस गोल्ड फ्यूचर्सच्या दरात 0.40 टक्क्यांची वाढ झाली असून 4485.84 डॉलर प्रति ट्रॉय स्तरावर पोहोचले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील सोन्याच्या दरातील वाढीचं प्रमुख कारण गोल्ड बॉण्ड यील्डमधील घसरण हे मानलं जातंय.
डॉलर निर्देशांकात 0.50 टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली आहे. डॉलर निर्देशांक 98.72 वर आला आहे. 10 वर्षांच्या बॉण्ड यील्डचे 4.79 टक्क्यांची घसरण होऊन ते 4.77 टक्क्यांवर आले आहेत.
सोने आणि चांदीच्या दरात तेजी आणि घसरण सुरु असली तर खरेदीचा ट्रेंड सुरु आहे. अमेरिकन फेड रिझर्व्हच्या धोरणात्मक बैठकीपूर्वी खरेदी दिसून येत आहे. अमेरिकन फेड रिझर्व्हची बैठक 15 आणि 16 सप्टेंबरला होणार आहे. सीएमई फेड वॉच टूलनुसार यावेळी फेड रिझर्व्हकडून व्याज दरात वाढ केली जाईल. मात्र, इराण आणि अमेरिकेच्या युद्धाचा सोन्याच्या मार्केटवर परिणाम पाहायला मिळतोय.
तज्ज्ञांचा अंदाज काय?
मास्टर कॅपिटल सर्व्हिसेसच प्रमुख रिसर्च ऑफिसर रवि सिंह यांच्या मते, जपानचे चलन येनमधील तेजी, डॉलर निर्देशांकातील घसरण आणि बुलियन्सच्या सपोर्टचा फायदा सोन्याला मिळाला आहे. यानंतर देखील कच्चा तेलाच्या दरातील वाढ आणि महागाई यामुळं सोने दरवाढीवर परिणाम झालाय.
रवि सिंह यांच्या अंदाजानुसार सोन्याचा दर 157000 रुपयांच्या खाली जाणं शॉर्ट टर्म कालावधीत चांगली स्थिती नाही. सद्यस्थितीत सोन्यासाठी 149000 ची लेव्हल महत्त्वाची ठरेल. सोन्याचे दर आणखी कमी झाल्यास दर 148000 रुपयांपर्यंत पोहोचू शकतात.
दरम्यान, पृथ्वी फिनमार्ट कमोडिटी रिसर्चचे मनोजकुमार जैन यांच्या रिपोर्टनुसार एमसीएक्स चांदीचा सपोर्ट प्राइस 236600 ते 235000 रुपयांदरम्यान आहे. सोने 152000 प्रति 10 ग्रॅम असताना खरेदी करणं योग्य ठरेल, असा मतप्रवाह तज्ज्ञांचा आहे.






















