Gold Price : ऑगस्ट महिन्यातील उच्चांकावरुन चांदी 56000 रुपयांनी स्वस्त, सोने दरात 23000 रुपयांची घसरण, सोने चांदीचे दर कशामुळं कोसळले?
Gold Price : सोने आणि चांदीच्या दरात ऑगस्टच्या उच्चांकाच्या तुलनेत मोठी घसरण झाली आहे. या घसरणीला अनेक गोष्टी कारणीभूत आहेत.

Gold Rate News नवी दिल्ली : तुम्ही जर सोने आणि चांदीमध्ये गुंतवणूक करत असाल तर तुम्हाला दोन्हीच्या दरात झालेली घसरण समजून घेणं आवश्यक आहे. ऑगस्टमध्ये उच्चांकावर पोहोचल्यानंतर सोने आणि चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळाली आहे. ऑगस्टच्या उच्चांकाच्या तुलनेत चांदी 56 हजार रुपयांनी स्वस्त झाली आहे. तर, सोन्याचा एका तोळ्याचा दर देखील 23000 रुपयांनी कमी झाला आहे. सोने आणि चांदी दर मोठ्या प्रमाणात का घसरले आहेत, त्याची नेमकी कारणं समजून घेणं महत्त्वाचं आहे.
अमेरिकेत व्याज दर वाढण्याची शक्यता, कच्चा तेलाच्या दरात झालेली वाढ, वाढता जागतिक तणाव या कारणांमुळं सोने आणि चांदीच्या दरांवर दबाव निर्माण होतोय.
ऑगस्टच्या उच्चांकानंतर सोने आणि चांदीचे दर कोणत्या कारणामुळं घसरले?
चांदीच्या दरात शुक्रवारी 6800 रुपयांची घसरण होऊन एक किलो चांदीचा दर 1,92,800 रुपयांवर पोहोचला. चांदीचा हा दर डिसेंबर 2025 नंतरचा सर्वात कमी दर आहे. ऑगस्ट महिन्यात चांदीचा एक किलोचा दर 2,48,800 रुपये होता, त्या हिशोबानं चांदीचा दर 56,000 रुपयांनी कमी झाला आहे.
सोन्याच्या दरात देखील ऑगस्टच्या तुलनेत मोठी घसरण झाली आहे. ऑगस्टमध्ये एक तोळे सोन्याचा दर 1,64,773 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. त्या तुलनेत सध्या सोन्याचा दर 23000 रुपयांनी कमी झाला आहे. चांदीच्या दरात सातत्यानं घसरण सुरु असल्यानं गुंतवणूकदारांची चिंता वाढली आहे. सोन्यावर देखील विक्रीचा दबाव वाढला आहे.
सोने आणि चांदीचे दर का गडगडले?
अमेरिकेत व्याज दर वाढण्याची शक्यता : जेव्हा व्याज दर वाढण्याची शक्यता असते तेव्हा गुंतवणूकदार सोने आणि चांदी ऐजी इतर व्याज देणाऱ्या गुंतवणूक पर्यायांचा विचार करतात.याचा परिणाम सोने आणि चांदीच्या मागणीवर होतो.
बॉन्ड यील्ड मधील वाढ: अमेरिकन बॉन्ड यील्ड मधून मिळणारा रिटर्न वाढल्यानं गुंतवणूकदार जिथून कमी व्याज दरानं परतावा मिळतो, अशा पर्यायांकडे वळत नाहीत.
कच्चे तेलाच्या दरात वाढ: आखाती देशात तणाव वाढला आहे. अमेरिकेनं इराणवर हल्ला करण्याचा इशारा दिला आहे. वाढलेल्या तावामुळं तेलाच्या पुरवठ्यात अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळं पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढण्याची शक्यता आहे. पेट्रोल आणि डिझेल महागल्यानं महागाईचं संकट निर्माण होतं. त्यामुळं केंद्रीय बँका व्याज दर अधिक ठेवण्याचा विचार करतात.
दरम्यान आयबीजेएच्या दरांनुसार 23 ऑक्टोबरला 24 कॅरेट सोन्याचा एक तोळ्याचा दर 1,46,426 रुपयांवरुन 4,796 रुपयांनी कमी होऊन 1,41,630 रुपयांवर आला आहे. तर, 22 तोळे सोन्याचा दर 134126 रुपयांवरुन कमी होऊन 129733 पोहोचला आहे. म्हणजेच 22 कॅरेट सोन्याचा दर 4393 रुपयांनी कमी झाला आहे.























