मुंबई : गेल्या काही दिवसांपासून चांदीच्या दरात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. रविवारी संध्याकाळी मार्केट बंद होताना चांदीच्या दरात तब्बल 1200 रुपयांची वाढ होऊन ती आता सत्तर हजारांच्या पार गेली आहे. रविवारी 69,200 रुपये भाव असणारी चांदी आज एक किलोसाठी 70,400 रुपयांवर पोहोचली आहे. सोन्याच्या भावात केवळ 10 रुपयांची वाढ झाली असून मुंबई आणि पुण्यात आज 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव हा 47,320 रुपये इतका आहे तर 22 कॅरेट सोन्याचा भाव हा 46,320 रुपये इतका आहे.
गेल्या आठवड्याचा विचार करता चांदीमध्ये मोठी चढ-उतार पहायला मिळाली आहे. 30 जून रोजी चांदीमध्ये 400 रुपयांची घट झाली होती. त्यानंतर 1 जुलैला 1100 रुपये, 3 जुलैला 700 रुपये तर आज 1200 रुपयांनी चांदीच्या दरात वाढ झाली आहे. तुलनेने सोन्याच्या किंमतीत किरकोळ बदल होताना दिसत आहेत.
सध्या सोन्याच्या किंमती आवाक्यातील असून त्यामध्ये गुंतवणूक करण्याचा हाच योग्य काळ असल्याचं मत काही तज्ज्ञांनी व्यक्त केलंय. येत्या काळात सोन्याच्या किंमती पुन्हा वाढण्याची शक्यता आहे असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्यामधील गुंतवणूक कमी झाली आहे, तसेच डॉलरच्या किंमतीच्या बळकटीकरणाचा परिणाम सोन्याच्या मागणीवर नकारात्मक झाला असून त्यामुळे सोन्याच्या किंमतीत सातत्याने घट होत आहे. गेल्या दोन महिन्यांमध्ये सोन्याच्या भावात घसरण झाल्याचं पहायला मिळतंय. पण येत्या काळात ही किंमत वाढण्याची शक्यता आहे असा अंदाज व्यक्त केला जातोय
कोरोनाच्या प्रादुर्भावाचा फटका सोन्याच्या किंमतीला बसल्याचं दिसत आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याच्या भावाने प्रती 10 ग्रॅमसाठी 56 हजार रुपयांचा विक्रमी आकडा गाठला होता. त्यानंतर सोन्याच्या भावामध्ये आता जवळपास दहा हजार रुपयांची घसरण झाल्याची पहायला मिळतंय.
महत्वाच्या बातम्या :