जळगाव : शिवसेनेत आपल्याला पालकमंत्र्यांसह शिवसेनेच्या नेत्यांकडून सन्मानजनक वागणूक दिली जात नाही, आपल्यासोबत दुजाभाव केला जात असल्याचा आरोप, शिवसेनेचे एरंडोल-पारोळाचे आमदार चिमणराव पाटील यांनी करत राजकीय क्षेत्रात खळबळ उडवून दिली होती. आमदार चिमणराव पाटील यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांचं नाव न घेता केलेल्या आरोपांमुळे जळगावातील शिवसेनेची अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली होती. अशातच आता पालकमंत्री आणि शिवसेनेच्या आमदारांत असलेल्या या वादात राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांनी उडी घेतली आहे. 


शिवसेनेचे एरंडोल-पारोळाचे आमदार चिमणराव पाटील यांच्या मुलाला जिल्हाध्यक्षाचं पद न मिळाल्यानं त्यांची ही आगपाखड होत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते डॉ. सतीश पाटील यांनी केला आहे. हा वाद शिवसेना पक्षांतर्गत असला तरी, आमदार चिमणराव पाटील यांनी नेहमीच चुकीचे राजकारण केले असून चुकीचं राजकारण करणे हाच त्यांचा कर्म आणि धर्म राहिला असल्याचही सतीश पाटील यांनी म्हटलं आहे. दरम्यान, आमदार चिमणराव पाटील आणि डॉ. सतीश पाटील हे पारोळा मतदार संघात एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक मानले जातात सेनेच्या नेत्यांच्या वादात राष्ट्रवादीच्या डॉ. सतीश पाटील यांनी उडी घेतल्याने राजकीय क्षेत्रांत मात्र हा चर्चेचा विषय बनला आहे. 


जळगावात राष्ट्रवादी पाठोपाठ शिवसेनेतील गटबाजी चव्हाट्यावर


जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादी पाठोपाठ शिवसेनेत देखील गटबाजी असल्याचं चव्हाट्यावर आलं आहे. ज्येष्ठ कार्यकर्ते असलेले आमदार चिमणराव पाटील यांनी मी पक्ष सोडून जावे यासाठी मला स्थानिक पातळीवरील नेते आणि कार्यकर्ते अपमानास्पद वागणूक देत आहेत, असा थेट आरोप एरंडोल-पारोळाचे आमदार यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांचं नाव न घेता केल्यानं राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. 


काय म्हणाले आमदार चिमणराव पाटील?


शिवसेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते असलेले आमदार चिमणराव पाटील यांनी यासंदर्भात बोलताना सांगितलं की, "अलीकडेच पक्षात नुकतीच नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती झाली. यात पारोळा तालुक्यात नवीन जिल्हाप्रमुख देण्यात आला आहे. मात्र याबाबत मला साधे विचारात सुद्धा घेतले नाही, माझ्या तालुक्यातील नियुक्तीबाबत मला साधी माहिती देखील देण्यात आली नाही. ही बातमी मला वर्तमानपत्रात वाचल्यावर लक्षात आली. तसेच निधीच्या बाबतीतसुद्धा स्थानिक पातळीवर इतर आमदारांना जसा निधी दिला जातो, तसा आपल्याला दिला जात नाही.", असं म्हणत हेतुपुरस्कर आपल्याला डावलल जात असल्याचा आरोप करीत आमदार चिमणराव पाटील यांनी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.


माझा पक्षातील वरीष्ठ नेत्यांवर राग नाही आणि त्यांचा ही माझ्यावर राग नाही. परंतु स्थानिक पातळीवर नेते जाणीव पूर्वक त्रास देत असून आपल्याला ज्या पद्धतीने सन्मानाने वागणूक दिली जायला पाहीजे, आपल्याला विचारात घेतले पाहिजे, तसे न होता, अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याचही आमदार चिमणराव पाटील यांनी म्हटलं आहे. 


बॅनरवर फोटो नसल्याने जळगावात राष्ट्रवादीतील गटबाजी प्रदेशाध्यक्षांसमोर उघड


राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील 'राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रे'निमित्त जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यांच्या उपस्थितीत जळगाव शहर आणि ग्रामीण मतदार संघाचा मेळावा घेण्यात आला होता. यावेळी जाहीर भाषणात उघडपणे फलकावरील फोटोवरुन माजी जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन यांनी माजी मंत्री गुलाबराव देवकरांबाबत नाराजी प्रकट केली होती. इतकेच नव्हे तर नेत्यांमधील मतभेद मिटवा, असे आवाहन केल्याने राष्ट्रवादीमधील गटबाजी प्रदेशाध्यक्षांसमोरच चव्हाट्यावर आली होती.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


जळगावात राष्ट्रवादी पाठोपाठ शिवसेनेतील गटबाजी चव्हाट्यावर; आमदाराचे स्वपक्षीय मंत्र्यावरच गंभीर आरोप