मुंबई : जागतिक पातळीवर सोन्याची मागणी वाढल्यामुळे सोन्याचा दर चांगलाच वाढला आहे. सोन्याबरोबर चांदीदेखील महागली आहे. आगामी काही दिवसांत चांदीचा भाव एक लाखांपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, सोनं कितीजरी महागलं तर त्याला एक वेगळी प्रतिष्ठा आहे. लोक सोने या धातुचा आभुषणांसाठी वापर करतात. तसेच सोन्यात केलेली गुंतवणूक ही सुरक्षित मानली जाते, त्यामुळे अनेक गुंतवणूकदार सोन्यात पैसे गुंतवतात. याच प्रकारे कठीण काळात देशातील आर्थिक परिस्थिती हाताळता यावी, यासाठी वेगवेगळे देशदेखील सोने खरेदी करतात. या शर्यतीत भारताचाही समावेश आहे. भारताने जानेवारी तेएप्रिल महिन्यात तब्बल 24 टन सोन्याची खरेदी केली आहे.


जानेवारी ते एप्रिल महिन्यात 24 टन सोन्याची खरेदी


जगातील अनेक देशांत सोने खरेदीची स्पर्धा लागली आहे. यामध्ये अमेरिका, चीन आदी देशांचाही समावेश आहे. भारताने जानेवारी ते एप्रिल महिन्यात तब्बल 24 टन सोने खरेदी केले आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत भारताने आठ टन अतिरिक्त सोने खरेदी केली आहे. या खरेदीनंतर आता भारताकडील सोन्याचा साठा थेट 827.69 टनांवर पोहोचला आहे. 


गेल्या वर्षाच्या तुलनेत सोन्याची अधिक खरेदी


जागतिक मंदी आली किंवा देशांतर्गत आर्थिक संकट निर्माण झाल्यास अशा स्थितीत कारभार चालवणे सोपे जावे म्हणून प्रत्येक देश सोने खरेदी करतो. वेगवेगळे देश मध्यवर्ती बँकांच्या मार्फत या सोन्याची खरेदी करतात. भारतात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून सोन्याची खरेदी होते. आरबीआयने 2022 च्या तुलनेत 2023 साली कमी सोन्याच खरेदी केली होती. मात्र या वर्षी पुन्हा एकदा भारताने सोन्याच्या खरेदीचे प्रमाण वाढवले आहे. दुसरीकडे आपले शेजारील राष्ट्र चीनदेखील सोन्याची मोठ्या प्रमाणावर साठवणूक करत आहे. त्यामुळे जागतिक पातळीवर सोन्याचा दर वाढला आहे.


जगभरात 290 टन सोन्याची खरेदी


जगभरात 2024 साली पहिल्या तिमाहीत एकूण 290 टन सोन्याची खरेदी झालेली आहे. यात सर्वाधिक सोन्याची खरेदी चीनने केली आहे. भारताचा विचार करायचा झाल्यास जानेवारी ते एप्रिल या काळात भारताने 16 टन सोने खरेदी केले होते. या वर्षी मात्र याच काळात भारताने एकूण 24 टन सोने खरेदी केले आहे. 


 अमेरिकेकडे सोन्याचा सर्वाधिक साठा 


सध्या अमेरिकेकडे सर्वाधिक सोन्याच्या साठा आहे. या देशाकडे 8133 टन सोने आहे. त्यानंतर जर्मनीकडे 3352 टन सोने आहे. भारताकडे एकूण 827 टन सोने आहे. 


हेही वाचा :


EPFO कडून एक नव्हे तर दिली जाते सात प्रकारची पेन्शन, जाणून घ्या सविस्तर


आयटीआर भरताना 'या' चुका कधीच करू नका, अन्यथा येऊ शकते प्राप्तिकर विभागाची नोटीस!