Gautam Adani on Hindenburg Report: अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी (Gautam Adani) यांनी अमेरिकन शॉर्ट सेलिंग फर्म हिंडेनबर्गला (Hindenburg) फटकारलं आहे. आमचे नुकसान करण्याच्या हेतूनं हिंडेनबर्ग यांनी त्यांच्या अहवालात आमच्यावर खोटे आणि निराधार आरोप केले असल्याचंही गौतम अदानी यांनी म्हटलं आहे.
हिंडेनबर्ग अहवाल चुकीची माहिती आणि बिनबुडाच्या आरोपांचं मिश्रण असल्याचं गौतम अदानी म्हणाले आहेत. हा अहवाल मुद्दाम आणि बदनामीच्या हेतून तयार केला होता, ज्याचा उद्देश आमच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचवण्याचा होता, असंही गौतम अदानी म्हणाले आहेत.
जानेवारीत आलेला हिंडेनबर्गचा अहवाल
याच वर्षी जानेवारीमध्ये एक अहवाल जाहीर करत हिंडेनबर्गनं अदानी ग्रुपच्या लिस्टेड कंपन्यांचे शेअर्स ओव्हरव्हॅल्युड असल्याचं म्हटलं होतं आणि अदानी ग्रुपनं शेल कंपन्यांच्या माध्यमातून खात्यात फेरफार केल्याचा आरोपही केला होता.
समूहाच्या 2023 च्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना गौतम अदानी म्हणाले की, हिंडनबर्गनं अदानी समूहाची प्रतिमा खराब करण्याच्या उद्देशानं हा अहवाल प्रसिद्ध केला होता. शेअर्सच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचवणं तसेच शेअरच्या किमती घसरून नफा कमावणं हा अहवालाचा उद्देश असल्याचंही अदानी म्हणाले आहेत.
गौतम अदानी म्हणाले की, हिंडनबर्गचा अहवाल आल्यानंतर लगेचच आम्ही तो फेटाळला होता. यानंतर सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणाच्या चौकशीसाठी एक समिती स्थापन केली. हा अहवाल मे 2023 मध्ये सार्वजनिक करण्यात आला आणि त्यामध्ये तज्ज्ञ समितीला कोणत्याही नियामक त्रुटी आढळल्या नाहीत.
20 हजार कोटींचा FPO परत घेतला
गौतम अदानी म्हणाले की, हिंडेनबर्ग अहवालानंतर एफपीओचे पूर्ण सदस्यत्व असूनही, आम्ही गुंतवणूकदारांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी पैसे परत करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, 27 जानेवारी 2023 रोजी अदानी समूहानं त्यांची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेसचा एफपीओ जारी केला होता आणि नंतर फुल सब्सक्राइब घेतल्यानंतर अचानक तो मागे घेतला. 20 हजार कोटी रुपयांचे एफपीओ काढून कंपनीनं सर्व गुंतवणूकदारांचे पैसे परत केले होते.
हिंडेनबर्गनं आपल्या घृणास्पद अहवालात अदानी समूहावर खात्यातील फसवणूक आणि स्टॉक व्हॅल्यूमध्ये फेरफार केल्याचा आरोप केला होता. यामुळे, अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली, ज्यामुळे समूहाचे बाजार मूल्य नीचांकी पातळीवर पोहोचले आणि ते सुमारे 145 अब्ज डॉलर्सनी घसरलं होतं.
FPO म्हणजे काय?
कंपनीसाठी पैसे उभारण्याचा एक मार्ग म्हणजे, FPO. स्टॉक मार्केटमध्ये आधीच सूचीबद्ध असलेली कंपनी गुंतवणूकदारांना नवीन शेअर्स ऑफर करते. स्टॉक मार्केटमध्ये आधीच सूचीबद्ध असलेली कंपनी गुंतवणूकदारांना नवीन शेअर्स ऑफर करते. हे शेअर्स आधीपासूनच बाजारात असलेल्या शेअर्सपेक्षा वेगळे असतात.