Mumbai Rain : मुंबईत मध्य रात्रीपासून पावसाची संततधार सुरुच आहे. अधून-मधून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळं सखोल भागात पाणी साचलं आहे. यामुळं काही भागात वाहतुकीवर परिणाम झाला आहे. मध्य रेल्वे लोकल ट्रेन वाहतूक 10 ते 15 मिनिटे उशिराने धावत आहे. दरम्यान, या मुसळधार पावसामुळं सांताक्रूझ मुंबई विमानतळाच्या बाहेर एक ते दीड फूट पाणी भरले आहे. त्यामुळं वाहनचालकांनी वाहन चालवताना अडचणी येत आहेत.
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार राज्याच्या काही भागात पाऊस कोसळत आहे. मुंबईसह उपनगरात सध्या जोरदार पाऊस सुरु आहे. काही ठिकाणी सखल भागात पाणी साचल्यामुळं रस्ते वाहतुकीवर परिणाम झालाय. तर काही ठिकाणी वाहतुक सुरळीत सुरु आहे. तर मध्य रेल्वे लोकल ट्रेन वाहतूक 10 ते 15 मिनिटे उशिराने धावत आहे.
ठाण्यात सकाळपासून जोरदार पावसाची हजेरी
ठाणे जिल्ह्यात देखील सकाळपासूच जोरदार पावसाला सुरुवात झालीय. वंदना आणि स्टेशन रोड परिसरात पाणी साचायला सुरुवात झाली आहे. त्यामुळं काही भागात वाहतुकीवर परिणाम होताना दिसत आहे. ठाण्यात मागील 24 तासात 83 मिमी पावसाची नोंद झाली आहे. ठाणे महापालिकेच्या नोंदीनुसार, पालिका परिसरात 65 मिमी पावसाची नोंद झाली आहे. आज दिवसभर पावसाची संततधार सुरूच राहणार आहे. दुपारनंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूरमध्ये मुसळधार पाऊस
रात्रीपासूनच उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळं अनेक सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे. यामुळं काही भागात वाहतुकीवर परिणाम झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. काही दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. अखेर चांगला पाऊस सुरु झाला आहे.
कोकणातही पावसाचा जोर वाढला
कोकणातही गेल्या काही दिवसापासून जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळं पोलादपूर तालुक्यातील सावित्री नदीला पूर आला असून ती सध्या पात्राबाहेर ओसांडून वाहत आहे. नदी किनाऱ्यावरील रहिवाशांना प्रशासनातर्फे सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पुढील तीन दिवस रायगड, रत्नागिरीला अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे.
राज्याच्या काही भागात जोरदार पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, कोकण विभागातील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्या आला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर विदर्भातील काही जिल्ह्यातही आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच मराठवाड्याच्या काही भागासह पालघर ठाणे आणि सातारा जिल्ह्यात पावसाचा यलो अवर्ट देण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या: