Amazon Future Group Deal : भारतातील रिटेल क्षेत्रातील वर्चस्वावरून सुरू असलेला वाद शमण्याची चिन्हं दिसत नाही. फ्युचर ग्रुपची कंपनी फ्युचर रिटेल आणि अॅमेझॉन दरम्यान सुरू असलेल्या कायदेशीर लढाईवर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू झाली. अॅमेझॉनने 1400 कोटींसाठी 26000 कोटींची आमची कंपनी उद्धवस्त केली असल्याचे फ्युचर ग्रुपने सुप्रीम कोर्टात सांगितले. 


कोर्टाबाहेर तोडगा नाहीच 


याआधी सुप्रीम कोर्टाने अॅमेझॉन (Amazon Inc) आणि फ्युचर रिटेल लिमिटेड (Future Retail Limited)यांना चर्चेतून मार्ग काढण्यास सांगितले होते. मात्र, दोन्ही कंपन्यांमध्ये झालेल्या चर्चेतून कोणताही तोडगा निघाला नाही. या दरम्यान, रिलायन्स इंडस्ट्रीजने फ्यूचर रिटेलचे बहुतांशी बिग बाजार आपल्या नियंत्रणात घेतले. किशोर बियानी यांच्या फ्युचर रिटेलने 4800 कोटी रुपयांचे भाडे न दिल्याने त्यांच्या नियंत्रणातील स्टोअर्स ताब्यात घेण्याशिवाय पर्याय नव्हता, असा तर्क रिलायन्सने दिला होता.


अॅमेझॉनने याआधी फ्युचर रिटेल आणि रिलायन्स इंडस्ट्रीजवर फसवणुकीचा आरोप लावला. त्यासाठी अॅमेझॉनने वृत्तपत्रांद्वारे जाहिरातीदेखील छापल्या. अॅमेझॉनसोबत फ्युचर ग्रुपचा करार हा फक्त 1400 कोटी रुपयांचा आहे. अॅमेझॉनने फक्त या रक्कमेसाठी 26 हजार कोटींची कंपनी उद्धवस्त केली असल्याचा आरोप फ्युचर ग्रुपने केला. आम्हाला उद्धवस्त करण्याचा अॅमेझॉनचा डाव होता आणि त्यात ते यशस्वी ठरले असल्याचेही फ्युचर ग्रुपने म्हटले. 


रिलायन्से स्टोअर्स ताब्यात घेतल्याच्या मुद्यावर कंपनीने म्हटले की, आमच्यासोबत कोणीही व्यवसाय करत नाही. आम्हाला लँडलॉर्ड अॅविक्शन नोटीस पाठवल्यावर आम्ही काय करणार असे हताश भूमिका कंपनीने कोर्टात मांडली. आतापर्यंत आम्हाला 835 स्टोअरचे नुकसान झाले असल्याचे फ्युचर ग्रुपने सांगितले. उर्वरित 374 स्टोअर हे इतरांच्या कृपेमुळे सुरू असल्याचे कंपनीने म्हटले. 


रिलायन्स आणि फ्युचर ग्रुपची मिलीभगत; अॅमेझॉनचा आरोप


अॅमेझॉनचे वकील गोपाल सुब्रमण्यम यांनी रिलायन्स आणि फ्युचर ग्रुपची मिलीभगत असल्याचे कोर्टात सांगितले. फ्युचर ग्रुपने सहजपणे आपले स्टोअर्स सहजपणे रिलायन्सच्या ताब्यात दिले याकडे त्यांनी लक्ष वेधले. 


या प्रकरणी पुढील सुनावणी 4 एप्रिल रोजी होणार आहे. फ्युचर ग्रुप आणि रिलायन्स इंडस्ट्री दरम्यान 3.4 अब्ज डॉलरचा करार झाला आहे.