Covaxine Vaccine : भारतातील नागरिकांना लसवंत करण्यात प्रमुख भूमिका बजावणाऱ्या भारत बायोटेक कंपनीने आपल्या कोवॅक्सिन लशीचे उत्पादन तात्पुरत्या काळासाठी कमी करण्याची घोषणा केली आहे. फॅसिलिटी ऑप्टिमायझेशनसाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे कंपनीने सांगितले. भारत बायोटेकनुसार, प्रोक्योरमेंट एजन्सींचा पुरवठा पूर्ण करण्यासाठी आणि सध्या लशीच्या मागणीत झालेली घट लक्षात हा निर्णय घेण्यात आला आहे. 


लशीच्या गुणवत्तेशी तडजोड नाही; कंपनीचे स्पष्टीकरण


भारत बायोटेकने सांगितले की, कोरोना महासाथीच्या आणीबाणीला तोंड देण्यासाठी मागील वर्षी लशीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर सुरू होते. कोवॅक्सिनची लस तयार करण्यासाठी उत्पादनाशी संबंधित बाबी नव्याने उभारण्यात आल्या होत्या. याच बाबींना आता अद्यावत करण्यात येणार आहे. कोरोना महासाथीच्या काळात काही अत्याधुनिक उपकरणे उपलब्ध नव्हती. मात्र, त्यामुळे लशीच्या गुणवत्तेवर परिणाम झाला नाही, अथवा गुणवत्तेसोबत तडजोडही केली नाही, असेही कंपनीने म्हटले. 


भारत बायोटेकचे निवेदन


COVAXIN लशीचे उत्पादन सर्व जागतिक नियामक आवश्यकतांची पूर्तता करते याची खात्री करण्यासाठी कंपनी आवश्यक ती पावले उचलण्यास कटिबद्ध आहे. त्यातूनच लस उत्पादनाशी निगडीत सुविधा अपग्रेड करण्याचे प्रयत्न सुरू आहे. लस उत्पादक कंपनी म्हणून लस सुरक्षितेला कायम प्राधान्य असेल असे कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले आहे. 


दरम्यान, देशात गेल्या 24 तासांत 1260 नव्या रुग्णांची नोद झाली असून 83 जणांचा मृत्यू झाला आहे. काल 1335 रुग्णांची नोंद आणि 52 रुग्णांचा मृत्यू झाला. जाणून घ्या देशातील कोरोनाची सध्याची परिस्थिती काय आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात शुक्रवारी दिवसभरात 1 हजार 404 कोरोनामुक्त झाले आहेत. त्यानंतर देशात सक्रिय रुग्णांच्या संख्येत घट होऊन कोरोनाबाधितांची संख्या 13 हजार 445 वर पोहोचली आहे. देशात आतापर्यंत 5 लाख 21 हजार 264 कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. देशात आतापर्यंत 4 कोटी 24 लाख 92 हजार 326 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोना महामारी सुरु झाल्यापासून आतापर्यंत देशात आतापर्यंत 4 कोटी 30 लाख 27 हजार 35 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.