Foreign investment : भारतीयांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली. भारतात मोठ्या प्रमाणात विदेशी गुंतवणूक (Foreign investment) होताना दिसत आहे. मिळालेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 5 दिवसात देशात सुमारे 12 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. मार्च महिन्यात विदेशी गुंतवणूकदारांनी भारताची अर्थव्यवस्था आणि शेअर बाजारावर पूर्ण विश्वास दाखवला आहे.


 भारतीय शेअर बाजारात मोठी गुंतवणूक


देशात फक्त 5 दिवसात 12 हजार कोटी रुपयांची एवढी मोठी गुंतवणूक झाली आहे. विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (FPIs) या महिन्यात (मार्च) आतापर्यंत भारतीय शेअर बाजारात 12000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. तर जानेवारी महिन्यात गुंतवणूकदारांनी शेअर बाजारातून 25700 कोटी रुपयांहून अधिक रक्कम काढून घेतली होती. फेब्रुवारी महिन्यात 1500 कोटींहून अधिक गुंतवणूक झाली. डिपॉझिटरी डेटानुसार, जानेवारी महिन्यात एफपीआयने शेअर बाजारात 11,823 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. यापूर्वी फेब्रुवारीमध्ये त्यांनी शेअर्समध्ये 1,539 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. जानेवारीमध्ये त्यांनी 25,743 कोटी रुपयांचे शेअर्स विकले होते. तज्ञांच्या मते, ही फक्त सुरुवात आहे. मार्च महिना हा गेल्या 11 महिन्यांतील दुसरा सर्वोत्तम महिना ठरु शकतो. डिसेंबर महिन्यात एफपीआयने 66 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. अशा परिस्थितीत मार्च महिन्यात 20 हजार कोटींहून अधिकची गुंतवणूक दिसण्याची शक्यता आहे.


FPI ने समीक्षाधीन कालावधीत कर्ज किंवा बाँड मार्केटमध्ये 3316 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. कर्ज किंवा बाँड मार्केटबद्दल बोलायचे झाले तर, जेपी मॉर्गन इंडेक्समध्ये भारत सरकारच्या बाँडचा समावेश करण्याच्या घोषणेमुळे प्रभावित होऊन FPIs गेल्या काही महिन्यांपासून डेट मार्केटमध्ये पैसे गुंतवत आहेत. त्यांनी फेब्रुवारीमध्ये रोखे बाजारात 22,419 कोटी रुपये, जानेवारीमध्ये 19,836 कोटी रुपये आणि डिसेंबरमध्ये 18,302 कोटी रुपये ठेवले होते. एकूणच, या वर्षात आतापर्यंत FPIs ने भारतीय शेअर बाजारातून 12,382 कोटी रुपये काढले आहेत. या काळात त्यांनी कर्ज बाजारात 45,572 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.


मार्चमध्ये एफपीआयचा कल मागील महिन्याच्या तुलनेत अधिक सकारात्मक दिसत आहे. चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत सकल देशांतर्गत उत्पादनाचा (जीडीपी) वाढीचा दर 8.4 टक्के अपेक्षेपेक्षा चांगला राहिला आहे. याशिवाय भारतातील बड्या कंपन्यांची कामगिरी चांगली आहे. यामुळे एफपीआयमध्ये भारतीय शेअर बाजार आकर्षक राहिला आहे. 


परकीय चलनसाठ्यात मोठी वाढ


परदेशी गुंतवणूकदारांचा भारताकडे अधिक कल वाढत असल्याचं चित्र दिसत आहे. गेल्या दोन आठवड्यात परकीय चलन साठ्यात (Forex reserve) 9.53 अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे 79 हजार कोटी रुपयांची वाढ झाली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने दिलेल्या माहितीनुसार, 1 मार्च रोजी संपलेल्या आठवड्यात भारताचा परकीय चलन साठा 6.55 अब्ज डॉलरने वाढून 625.626 अब्ज डॉलर झाला आहे.


महत्वाच्या बातम्या:


दिलासादायक! परकीय गंगाजळी वाढली, सलग दुसऱ्या आठवड्यात परकीय चलनसाठ्यात वाढ