(Source: ECI/ABP News/ABP Majha)
FPI : परदेशी गुंतवणुकदारांकडून विक्रीचा सपाटा, आतापर्यंत 14 हजार कोटींची विक्री; जाणून घ्या कारण
Share Market Foreign Investors : शेअर बाजारातून परदेशी गुंतवणुकदारांकडून सातत्याने शेअर विक्री सुरू असल्याने बाजारावर त्याचा परिणाम दिसून येत आहे.
Share Market Foreign Investors : परदेशी गुंतवणुकदारांकडून भारतीय शेअर बाजारात विक्रीचा सपाटा सुरू आहे. त्यामुळे देशांतर्गत बाजारातही घसरण होत आहे. जागतिक पातळीवर सुरू असलेल्या घडामोडींचा परिणाम शेअर बाजारावर दिसून येत आहे. त्यामुळे परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणुकदारांकडून (FPI) विक्रीचा सपाटा सुरू आहे.
FPIsने या महिन्यात आतापर्यंत भारतीय बाजारातून 14,000 कोटी रुपये काढले आहेत. डिपॉझिटरी डेटानुसार, FPIs ने यावर्षी भारतीय शेअर बाजारातून आतापर्यंत 1.81 लाख कोटी रुपये काढले आहेत.
यापुढेही विक्री सुरू राहील
जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर म्हणाले की, परदेशी गुंतवणुकदारांकडू यापुढेही विक्री सुरूच राहणार आहे. मात्र, अल्प आणि मध्यम कालावधीत विक्रीचे प्रमाण कमी होईल, असेही त्यांनी म्हटले.
विक्रीचे कारण काय?
अर्थव्यवस्थेतील मंदी, वाढत असणारी महागाई आदी प्रमुख कारण या विक्रीमागे असल्याचे नायर यांनी सांगितले. जगभरातील अनेक देशांमध्ये मध्यवर्ती बँकांकडून महागाईवरील नियंत्रणासाठी कठोर उपाय योजना आखल्या जात आहेत, याच्या परिणामी परदेशी गुंतवणुकदारांकडून बाजारात विक्री सुरू असल्याचे नायर यांनी सांगितले.
ऑक्टोबरपासून विक्रीचा सपाटा
आकडेवारीनुसार, 1 ते 10 जून दरम्यान FPIs ने भारतीय शेअर बाजारातून 13,888 कोटी रुपये काढले आहेत. ऑक्टोबर 2021 पासून विक्री सुरू आहे. अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हच्या आक्रमक भूमिकेमुळे सध्या FPI ची विक्री सुरू आहे असल्याचे नायर यांनी सांगितले.
एफपीआयने इक्विटी व्यतिरिक्त कर्ज किंवा रोखे बाजारातून 600 कोटी रुपये काढले आहेत. मॉर्निंगस्टार इंडियाचे एसोसिएट संचालक, हिमांशू श्रीवास्तव यांनी सांगितले की, जोखीमच्यादृष्टीने पाहता अमेरिकेत व्याजदरात वाढ झाल्याने भारतीय रोखे बाजार हा परदेशी गुंतवणुकदारांसाठी आकर्षक गुंतवणूक पर्याय राहिला नाही.
भारताशिवाय, तैवान, दक्षिण कोरिया, थायलंड आणि फिलिपाइन्स यादेशातील शेअर बाजारातून परदेशी गुंतवणुकदारांकडून विक्रीचा सपाटा सुरू आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या: