Nirmala Sitharaman On Adani : अदानी समूहाबाबत (Adani Group) अमेरिकन रिसर्च फर्म हिंडेनबर्गने प्रसिद्ध केलेल्या संशोधन अहवालामुळे कंपनीला मोठे नुकसान झाले आहे. या अहवालामुळे गेल्या सहा दिवसांत अदानी समूहाच्या कंपन्यांचे 46 टक्के नुकसान झाले आहे. त्याच वेळी, कंपनीच्या बाजार भांडवलात 876524 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. अदानी समूहाच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या भारतीय बँका आणि एलआयसीला (LIC) देखील झटका बसला आहे. गुंतवणुकदारही चिंतेत आहेत. या मुद्द्यावरून संसदेत प्रचंड गदारोळ झाला. आता अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अदानी प्रकरणी पहिल्यांदाच आपले मत मांडले आहे.
निर्मला सीतारमण यांनी मौन सोडले
CNBC-TV18 ला दिलेल्या मुलाखतीत अर्थ मंत्री निर्मला सीतारमण यांनी अदानी प्रकरणावर भाष्य केले आहे. सीतारमण यांनी म्हटले की, भारतीय बँकिंग व्यवस्था चांगल्या स्थितीत आहे. लोकांनी घाबरण्याचे कोणतेही कारण नाही. भारतीय स्टेट बँक आणि एलआयसी यांची अदानी समूहातील गुंतवणूक ही एका मर्यादेत आहे. बँक आणि एलआयसी दोन्ही नफ्यात आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांनी चिंता करण्याची आवश्यकता नसल्याचे त्यांनी म्हटले.
एलआयसी आणि एसबीआयच्या गुंतवणुकीवरून उपस्थित होत असलेल्या मुद्यावर भाष्य करताना सीतारमण यांनी म्हटले की, स्टेट बँक आणि एलआयसीशी संबंधित सीएमडींनी अधिक सविस्तरपणे माहिती दिली आहे. भारतीय बँकांनी आपल्यावरील एनपीएचा बोझा कमी करण्यास यश मिळवले असून बँका चांगल्या स्थितीत आहेत.
एसबीआय आणि एलआयसी हे दोन्ही ओव्हरएक्सपोझड नसल्याचे सीतारमण यांनी म्हटले. अदानी समूहात त्यांची गुंतवणूक एका मर्यादेत आहे. अदानी समूहातील कंपन्यांचे शेअर दर गडगडले तरी गुंतवणुकीवर चांगला नफा मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले.
अदानी समूहाला दिलासा
अमेरिकेतील रिसर्च फर्म हिंडेनबर्गने प्रसिद्ध केलेल्या अहवालानंतर अडचणीत सापडलेल्या अदानी समूहाला (Adani Group) आज मोठा दिलासा मिळाला आहे. क्रेडिट सुईस आणि सिटी ग्रुपने अदानींच्या बाँडवर कर्ज देण्यास नकार दिल्यानंतर त्याचे पडसाद बाजारातही उमटले. मात्र, आज दोन जागतिक रेटिंग कंपन्यांनी अदानी समूहाला दिलासा देणारी बातमी दिल्यानंतर अदानी समूहाची फ्लॅगशिप कंपनी अदानी एंटरप्रायझेसच्या (Adani Enterprises) शेअर्समध्ये तेजी दिसून आली. आज दिवसभरातील व्यवहारात अदानी एंटरप्रायझेसने नीचांकी पातळीवरून उसळण घेतली. अदानी समूहाच्या सध्याच्या स्थितीमुळे त्यांच्या रेटिंग्सवर कोणताही परिणाम होणार नाही. अदानी समूहातील कंपन्यांच्या शेअर दरावर आमची नजर असल्याचेही त्यांनी सांगितले. अदानी समूहाच्या रेटिंगमध्ये बदल करायचा असल्यास त्याच्या सर्व पैलूंचा अभ्यास केला जाईल. त्याशिवाय, कोणताही बदल केला जाणार नाही असेही फिच आणि मूडीजने म्हटले.