LIC Investment In Adani :  देशातील सर्वात मोठी विमा कंपनी असलेल्या भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच LIC चा अदानी समूहातील गुंतवणुकीतून होणारा नफा सातत्याने कमी होत आहे. अदानी समूहातील कंपन्यांच्या शेअर दरात होत असलेल्या घसरणीचा फटका एलआयसीला बसत आहे.  LIC ची अदानी समूहातील सात 7 कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक आहे. पण एलआयसीने प्रामुख्याने अदानी समूहाच्या चार कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे. ही गुंतवणूक 24000 कोटी रुपये आहे. अदानी एंटरप्रायझेस, अदानी टोटल गॅस, अदानी ग्रीन एनर्जी आणि अदानी ट्रान्समिशन यामध्ये एलआयसीची मोठी गुंतवणूक आहे. LIC ने डिसेंबर 2022 नंतर अदानीच्या या चार शेअर्समधील आपला हिस्सा कमी केलेला नाही. ही बाब लक्षात घेता या गुंतवणुकीचे मूल्यांकन सध्याच्या बाजारभावांनुसार, 27000 कोटी रुपये आहे.


'बिझनेस टुडे'ने केलेल्या अभ्यासानुसार, या चार कंपन्यांच्या शेअर्सची सरासरी खरेदी किंमत आणि सध्याची बाजारभाव लक्षात घेऊन हा आकडा काढण्यात आला आहे.  24 जानेवारी 2023 रोजी अदानी समूहावर हिंडेनबर्गने आपला अहवाल प्रकाशित केला. त्यानंतर अदानी समूहाच्या शेअर्स दरात दररोज मोठी घसरण सुरू आहे. हिंडेनबर्गच्या रिपोर्टनंतर अदानी समूहातील काही कंपन्यांचे शेअर्स हे 50 टक्क्यांपर्यंत घसरले आहेत. 


अदानी ट्रान्समिशन


अदानी ट्रान्समिशनमध्ये एलआयसीने खरेदी केलेल्या प्रत्येक शेअरची सरासरी किंमत 840 रुपये आहे. अदानी ट्रान्समिशनमध्ये एलआयसीचे एकूण गुंतवणूक मूल्य 3415 कोटी रुपये आहे. 2 फेब्रुवारी 2023 रोजी या गुंतवणुकीचे मूल्य 6334 कोटी रुपये होते. 2 फेब्रुवारी रोजी अदानी ट्रान्समिशनचे शेअर्स बुधवारी बंद झालेल्या बाजारातील किमतीपेक्षा 10 टक्क्यांनी कमी होऊन 1557.25 रुपयांवर व्यवहार करत होते.


अदानी टोटल गॅस


अदानी टोटल गॅसच्या एका शेअरची जवळपास किंमत 1300 रुपयांच्या घरात आहे आणि अदानी टोटल गॅसमध्ये एलआयसीची एकूण गुंतवणूक 8525 कोटी रुपये आहे. या गुंतवणुकीचे सध्याचे मूल्य 11225 कोटी रुपये आहे. आत्तापासून म्हणजे 2 फेब्रुवारी 2023 रोजी अदानी टोटल गॅसचे शेअर्स 1711.50 रुपयांवर व्यवहार करत होते. बुधवारच्या व्यवहारापासूनच्या मूल्यांकनापासून 10 टक्क्यांनी कमी आहे.


अदानी ग्रीन एनर्जी


एलआयसीने अदानी ग्रीन एनर्जीमध्ये गुंतवणूक करताना एका शेअरची किंमत 1800 रुपयांच्या आसपास होती. या फर्ममध्ये कंपनीचे एकूण गुंतवणूक मूल्य रु.3610 कोटी आहे. 2 फेब्रुवारी 2023 रोजी या गुंतवणुकीचे मूल्य 2108.2 कोटी रुपये होते. अदानी ग्रीनचे शेअर्स गुरुवारी 1038.05 रुपयांवर व्यवहार करत होते. 


अदानी एंटरप्रायझेस


LIC ने अदानी एंटरप्रायझेसमध्ये खरेदी केलेल्या शेअर्सची सरासरी किंमत रुपये 1720 होती. या गुंतवणुकीची एकूण किंमत 8285 कोटी आहे. गुरुवारी,  2 फेब्रुवारी 2023 रोजी या गुंतवणुकीचे मूल्य 9545.6 कोटी रुपये इतके होते. अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स बुधवारच्या बंद किमतीच्या तुलनेत गुरुवारी 26.5 टक्क्यांनी कमी होऊन 1564.70 रुपयांवर बंद झाले.


10 दिवसात 30000 कोटी स्वाहा 


LIC ने अदानी ग्रुपच्या या चार कंपन्यांमध्ये 23,840 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. गुरुवारी 2 फेब्रुवारी 2023 रोजी बाजारातील किमतींवर आधारित, या गुंतवणुकीचे मूल्य 27,200 कोटी रुपये होते.


अदानी ग्रीन एनर्जी आणि अदानी एंटरप्रायझेस वगळता, एलआयसी अजूनही उर्वरित 2 कंपन्यांच्या शेअर्सवर नफा कमवत आहे. मात्र, हा  नफा बुधवारच्या तुलनेत गुरुवारी कमी झाला आहे. दुसरीकडे, 24 जानेवारीशी तुलना केल्यास,तेव्हा अदानीच्या या चार कंपन्यांमध्ये एलआयसीची गुंतवणूक 57166 कोटी रुपयांची होती. म्हणजेच तेव्हा एलआयसीला 33000 कोटींचा नफा मिळत होता. तो आता 3300 कोटींवर आला आहे. या चार कंपन्यांमध्ये एलआयसीने काही महिन्यात कमावलेले सुमारे 30000 कोटी रुपये अवघ्या 10 दिवसांत बुडाले आहेत.