Fake Currency : केंद्र सरकारने केलेल्या नोटाबंदीचे समर्थन करताना बाजारातून बनावट नोटा हद्द पार करण्याचा प्रयत्न असल्याचा दावा करण्यात येत होता. मात्र, हा दावा फोल ठरत असल्याचे चित्र आहे. देशात बनावट नोटांचा सुळसुळाट वाढला असून 500 रुपयांच्या बनावट नोटांमध्ये 100 टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे रिझर्व्ह बँकेने आपल्या अहवालात म्हटले. त्याशिवाय, 2000 रुपयांच्या नोटांचा वापरही कमी झाला आहे.

  


रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी दिलेल्या माहितीनुसार, आर्थिक वर्ष 2020-2021 या वर्षात 500 रुपयांच्या बनावट नोटांमध्ये 101.9 टक्के वाढ झाली असल्याचे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे. तर, 2000 रुपयांच्या बनावट नोटांमध्ये 54.16 टक्के वाढ झाली आहे. या सगळ्या नोटा नव्या डिझाइनमधील आहेत. 


रिझर्व्ह बँकेने दिलेल्या माहितीनुसार, 31 मार्च 2022 पर्यंत चलनात असलेल्या एकूण नोटांच्या मूल्यापैकी 500 आणि 2000 रुपयांच्या नोटांचा वाटा 87.1 टक्के होता. हेच प्रमाण 31 मार्च 2021 पर्यंत 85.7 टक्के इतके होते. 


मागील आर्थिक वर्ष 31 मार्च 2022 पर्यंत 500 आणि 2000 रुपयांच्या नोटांचा वाटा एकूण मुल्याच्या 87.1 टक्के इतका होता. तर, 31 मार्च 2021 पर्यंत हा आकडा 85.7 टक्के इतका झाला. सरत्या आर्थिक वर्षात 500 रुपयांच्या नोटांचा वाटा सर्वाधिक होता. हे प्रमाण 34.9 टक्के इतका होता. त्यानंतर 10 रुपयांच्या नोटांचे प्रमाण अधिक आहे. एकूण नोटांच्या प्रमाणात 10 रुपयांच्या नोटांचे प्रमाण 21.3 टक्के इतके आहे. 


50 आणि 100 रुपयांच्या बनावट नोटांमध्ये घट


मागील वर्षाच्या तुलनेत 10 रुपये, 20 रुपये, 200 रुपये, 500 रुपये (नवीन डिझाईन) आणि 2000 रुपयांच्या बनावट नोटांमध्ये अनुक्रमे 16.4%, 16.5%, 11.7%, 101.9% आणि 54.6% वाढ झाली आहे. त्याच वेळी, 50 रुपयांच्या बनावट नोटांमध्ये 28.7 टक्के आणि 100 रुपयांच्या बनावट नोटांमध्ये 16.7 टक्क्यांनी घट झाली असल्याचे रिझर्व्ह बँकेने आपल्या अहवालात नमूद केले आहे. 


दोन हजाराच्या नोटांमध्ये घट


केंद्र सरकारने केलेल्या नोटा बंदीनंतर आरबीआयने 2000 रुपयांची नोट चलनात आणली. मात्र, मागील काही वर्षांपासून  या 2000 रुपयांच्या नोटा चलनातून कमी होत असल्याचे म्हटले जात आहे. मार्च अखेरीस दोन हजाराच्या नोटांचा चलनातील वाटा कमी झाला असून 1.6 टक्के इतकाच राहिला आहे. सध्या जवळपास 214 कोटी नोटांचा वापर सुरू आहे. या मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत सर्व मूल्याच्या नोटांची एकूण संख्या 13,053 कोटी इतकी होती. त्याआधी एक वर्षाच्या आधी हा आकडा 12,437 कोटी इतका होता. 


पाहा व्हिडिओ : देशात बनावट नोटांचा सुळसुळाट, आरबीआयची चक्रावणारी आकडेवारी