Ravikant Tupkar : अचानक नाफेडनं हरभरा खरेदी बंद केल्यानंतर विविध स्तरातून टीका होताना दिसत आहे. नाफेडनं हरभरा खरेदी पुन्हा सुरु करावी अशी मागणी विविध संघटनांकडून होत आहे. नाफेडनं खरेदी बंद केल्यामुळं शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान होत आहे. अशी अचानक खरेदी बंद करणं चुकीचं आहे. जर नाफेडनं तत्काळ खरेदी सुरु केली नाही तर रस्त्यावर उतरुन आक्रमक आंदोलन करणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar ) यांनी दिला.


नेमकं काय म्हणाले तुपकर


गेल्या आठ दिवसापासून नाफेडनं राज्यभरात शासकीय हरभरा खरेदी केंद्र अचानक बंद केली आहेत. त्यामुळं हजारोंच्या संख्येनं शेतकरी शासकीय खरेदी केंद्रावर माल घेऊन आले होते. त्यांच्या हानांसह ते शेतकरी खरेदी केंद्रावरच खरेदी होण्याची वाट बघत थांबले आहेत. त्यांच्या वाहनांचे भाडे तसेच सुरु आहे. त्यामुळं शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान होत आहे. अशी अचानक खरेदी बंद करणं अत्यंत चुकीचं आहे. ज्या ज्या वेळी शेतकऱ्यांचा माल खरेदी करण्याची वेळ येते तेव्हा सरकारकडून नेहमीच असे धोरण राबवून शेतककऱ्यांना वाऱ्यावर सोडले जातेय सरकारच्या अशा धोरणाचा तीव्र निषेध करत आंदोलनाचा इशारा रविकांत तुपकर यांनी दिला आहे.


हरभरा खरेदीचं उद्दिष्ट पूर्ण झाल्याचं कारण पुढे करुन दिलेल्या मुदतीपूर्वीच नाफेडने हरभरा खरेदी बंद केली आहे. हरभरा उत्पादक शेतकरी सरकारच्या या कृतीमुळे हवालदिल झाले आहेत. राज्यभर खरेदी केंद्रांवर हजारो वाहने उभी असताना अचानक खरेदी बंद केल्याचे सांगण्यात आल्याने शेतकऱ्यांची प्रचंड कोंडी झाली आहे. वाहनांचे भाडे दररोज वाढत असून नाईटचार्ज भरावा लागत असल्याने व खरेदी होईल याची शाश्वती नसल्याने शेतकरी काकुळतीला आल्याचे किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले यांनी सांगितले. राज्यात नाफेडद्वारे 5 हजार 230 रुपये प्रति क्विंटल दराने हरभरा खरेदीची प्रक्रिया सुरु होती. खुल्या बाजारात 4 हजार 200 रुपये दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी नाफेडला हरभरा विकण्याचा पर्याय निवडला होता. मात्र, अचानक नाफेडनं खरेदी बंद केल्यानं शेतकरी अडचणीत सापडले आहेत. यावरुन विविध संघटना आक्रमक झाल्या आहेत.


महत्वाच्या बातम्या: