Onion Export News : केंद्र सरकारनं कांद्याची निर्यातबंदी (Onion Export Ban) हटवल्यानंतर 45 हजार टन कांद्याची निर्यात झाली आहे. ही निर्यात मागील 18 दिवसात झाली आहे. सरकारनं  3 मे रोजी कांद्याच्या निर्यातीवरील बंदी हटवली होती. त्यानंतर आत्तापर्यंत 45 हजार टन कांद्याची निर्यात होऊनही शेतकरी नाराज आहे. शेतकरी नेमके नाराज का आहेत? नेमकं प्रकरण काय? याबाबतची सविस्तर माहिती पाहुयात. 


कवडीमोल दरानं कांद्याची विक्री 


कांद्यावरील निर्यातबंदी हटवून देखील शेतकऱ्यांना कमी दरात कांदा विकावा लागत आहे. याचे कारण म्हणजे कांद्याच्या निर्यातीवर लावलेली बंधने. यामध्ये कांद्यावरील किमान निर्यात मूल्य आणि निर्यात शुल्क यांचा समावेश आहे. यामध्ये किमान मूल्य हे 500 डॉलर प्रतिटन आहे. तर निर्यात शुल्क हे 40 टक्के आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कवडीमोल भावाने कांदा बाजारात विकावा लागत आहे. यामुळं शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च देखील निघत नाही. 


 8 डिसेंबर 2023 रोजी कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली होती


सध्या लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. या काळात कोणत्याही वस्तूंच्या किंमती वाढू नये असे सरकारला वाटत आहे. त्यामुळं सरकारनं दर निंयत्रणात ठेवण्यासाठी विविध धोरणं आखली आहेत. यातीलच एक धोरण म्हणजे कांद्याच्या निर्यातीवर घातलेली बंदी. सरकारनं 8 डिसेंबर 2023 रोजी कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली होती. ही बंदी 31 मार्च 2024 पर्यंत असेल असं सांगितलं होतं. मात्र, सरकारनं मार्चमध्ये कांद्यावरील निर्यातंबदी उठवली नाही. जोपर्यंत पुढील आदेश येत नाही तोपर्यंत कांदा निर्यातबंदी कायम राहणार असे सरकारनं सांगितलं. त्यानंतर 3 मे रोजी सरकारनं कांद्याच्या निर्यातीवरील बंदी हटवली आहे. बंदी हटवल्यापासून आत्तापर्यंत 45 हजार टन कांद्याची निर्यात झाली आहे. एवढी निर्यात होऊनही शेतकरी नाराज आहेत. कारण त्यांच्या कांद्याला योग्य तो दर मिळत नसल्याचे चित्र आहे. सर्वाधिक कांद्याची निर्यात ही पश्चिम आशिया आणि बांगलादेशात होते.


चालू वर्षात 5,00,000 टन कांदा खरेदीचं लक्ष 


चालू वर्षासाठी सरकारनं 5,00,000 टन कांदा खरेदी करुन लक्ष्य बफर स्टॉक करण्याचे लक्ष ठेवले आहे. सध्या नुकत्याच झालेल्या रब्बी (हिवाळी) पिकातून कांद्याची खरेदी सुरू केली आहे. कृषी मंत्रालयाच्या प्राथमिक अंदाजानुसार, महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र या प्रमुख उत्पादक प्रदेशांमध्ये उत्पादन कमी झाल्यामुळे देशातील कांद्याचे उत्पादन वर्ष 2023-24 मध्ये 16 टक्क्यांनी घटून 25.4 दशलक्ष टन होईल. दुसरीकडे महाराष्ट्रातून आलेली बातमी अतिशय धक्कादायक आहे. नुकसान सोसून शेतकऱ्यांना कांदा बाजारात विकावा लागत आहे. निर्यातीवर किमान निर्यात मूल्य आणि 40 टक्के निर्यात शुल्क लागू केल्याने शेतकऱ्यांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. बाजारपेठेत कांद्याचा पुरवठा वाढला आहे. त्याचा परिणाम भावावर दिसून येत आहे. 


महत्वाच्या बातम्या:


कांद्याचे दर वाढणार कधी? निर्यातबंदी हटवून 20 दिवस झाले तरीही दर जैसे थे, शेतकरी चिंतेत