मुंबई: कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) ने 2022 च्या अखेरीस देशभरात आरोग्य विमा योजना ईएसआयसी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ESIC च्या 188 व्या बैठकीत देशभरात वैद्यकीय सुविधा आणि सेवा पुरवठा प्रणालीचा विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला.


सध्या, देशातील 443 जिल्ह्यांमध्ये कर्मचारी राज्य विमा (ESI) योजना पूर्णत: लागू करण्यात आली आहे, तर 153 जिल्ह्यांमध्ये ती अंशतः लागू केली जात आहे. देशातील 148 जिल्हे अजूनही या योजनेच्या कक्षेबाहेर आहेत. लवकरच या जिल्ह्यांना ही सुविधा उपलब्ध करून देण्याची तयारी सुरू आहे. या वर्षाच्या अखेरीस ही योजना देशभरात लागू केली जाईल अशी माहिती केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी  


अंशत: अंमलात आलेल्या जिल्ह्यांनाही पूर्ण सुविधा
या वर्षाच्या अखेरीस अंशतः ईएसआय योजनेत समाविष्ट असलेले आणि अद्याप त्यात समाविष्ट न झालेले सर्व जिल्हे या योजनेच्या कक्षेत आणले जातील असं कामगार मंत्रालयाने म्हटले आहे. यामध्ये नवीन दवाखाने आणि सहयोगी शाखा कार्यालये (DCBOs) स्थापन करून आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली जाईल. याशिवाय ESIC ने देशभरात 2,300 खाटांची नवीन रुग्णालये उघडण्याचा निर्णय घेतला आहे.


..या राज्यांमध्ये नवीन रुग्णालये
महाराष्ट्रात सहा, हरियाणामध्ये चार, तामिळनाडू, उत्तर प्रदेश आणि कर्नाटकमध्ये प्रत्येकी दोन रुग्णालये सुरू केली जातील. आंध्र प्रदेश, छत्तीसगड, गोवा, गुजरात, मध्य प्रदेश, ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये प्रत्येकी एक रुग्णालय सुरू केले जाईल असं कामगार मंत्रालयाने म्हटलं आहे. याशिवाय विविध ठिकाणी दवाखानेही सुरू करण्यात येणार आहेत. ही रुग्णालये आणि दवाखाने विमाधारक कर्मचारी आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्यांना उत्तम दर्जाची आरोग्य सेवा प्रदान करू शकतील.


योजनेचा लाभ कोणाला?
ईएसआयसी राज्य कर्मचारी आणि त्यांच्या अवलंबितांना मोफत वैद्यकीय सल्ला आणि औषधे पुरवते. यासाठी कर्मचाऱ्याला ईएसआय कार्ड बनवावे लागेल, त्यानंतर त्याला ओपीडी सुविधा आणि मोफत औषधांचा लाभ मिळतो. प्रत्येक राज्य आपल्या कर्मचाऱ्यांसाठी ESIC अंतर्गत विविध सुविधा पुरवते. मात्र, त्यातील बहुतांश निधी केंद्राकडून दिला जातो.