Elon Musk Terminate Twitter CEO : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटर (Twitter Deal) खरेदी केल्यानंतर पराग अग्रवाल (Parag Agrawal) यांची हकालपट्टी केली आहे. ट्विटरचा बहुचर्चित ठरलेला करार अखेर पूर्ण झाला आहे. यानंतर आता जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती टेस्लाचे मालक एलॉन मस्क हे ट्विटर कंपनी नवे मालक बनले आहेत. ट्विटरची मालकी मिळताच एलॉन मस्क यांनी मोठे बदल केले आहेत. रॉयटर्स वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, एलॉन मस्क यांनी ट्विटरचे सीईओ (CEO - Chief Executive Officer) पराग अग्रवाल यांची हकालपट्टी केली आहे. इतकंच नाही तर सीएफओ (CFO - Chief Financial Office) नेड सेगल (Ned Segal) यांनाही कामावरून कमी करत, या दोघांना कंपनीच्या मुख्य कार्यालयातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.
तीन बड्या अधिकाऱ्यांना हटवलं
ट्विटरची मालकी आता टेस्लाचे एलन मस्क यांच्याकडे आली आहे. 44 बिलियन डॉलर्सच्या व्यवहारावर मस्क यांनी अखेर शिक्कामोर्तब केला आहे. ट्विटर ताब्यात येताच मस्क यांनी ट्विटरच्या तीन टॉप अधिकाऱ्यांना कंपनीतून हटवलं आहे. मस्क यांनी ट्विटरचे चीफ एक्झिक्युटिव्ह पराग अग्रवाल, चीफ फायनान्स ऑफिसर नेद सेगल आणि लीगल आणि पॉलिसी विभागाच्या प्रमुख विजया गड्डे यांना तातडीनं हटवण्याचा निर्णय घेतला आहे. ट्विटरवरील फेक अकाऊंटबाबत मस्क आणि ट्विटरच्या गुंतवणूकदारांची दिशाभूल केली असा ठपका ठेवत तीन अधिकाऱ्यांना हटवण्यात आलंय.
75 टक्के कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात
एलॉन मस्क यांनी ट्विटर खरेदी केल्यानंतर फक्त सीईओ पराग अग्रवालच नाही तर अनेक कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात असल्याचं म्हटलं जात आहे. ट्विटरची मालकी मिळाल्यावर एलॉन मस्क 75 टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याच्या विचारात आहे. सध्या ट्विटर कंपनीमध्ये 7500 कर्मचारी कार्यरत आहेत. रिपोर्टनुसार, एलॉन मस्क ट्विटर कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याच्या विचारात असल्याचं समोर येत. तसेच ट्विटर डील पूर्ण झाल्यानंतर कंपनीमध्ये हालचालींना वेग आल्याचं म्हटलं जात आहे. एकीकडे सीईओ पराग अग्रवाल आणि सीएफओ नेल सेग यांना हटवल्यानंतर मस्क आणखी मोठे बदल करण्याच्या तयारीत आहेत.
मस्क यांनी ट्विटर डीलमधून घेतली होती माघार
एलॉन मस्क (Elon Musk) यांची ट्विटर डील मागील काही काळापासून प्रचंड चर्चेत आहे. बहुचर्चित ट्विटर डील (Twitter Deal) अखेर पूर्ण झाली आहे. जगातील श्रीमंत व्यक्ती आणि टेस्लाचे तसेच स्पेसएक्सचे मालक एलॉन मस्क (Elon Musk) यांनी एप्रिल महिन्यामध्ये ट्विटर (Twitter) खरेदी करण्याची घोषणा केली. त्यानंतर बनावट अकाऊंटची माहिती लपवल्याचा आणि बनावट खात्यांसंबंधित योग्य माहिती न दिल्याचा आरोप करत मस्क यांनी ट्विटर खरेदी करण्याचा निर्णय मागे घेत ट्विटर डील मोडली. त्यानंतर आता अखेर मस्क यांनी सुरुवातील ठरलेल्या किंमतीमध्ये म्हणजेच 44 अब्ज डॉलर्समध्येच ट्विटर कंपनी खरेदी केली आहे.