Elon Musk : टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क आणि ट्विटर (Twitter) यांच्यातील 44 अब्ज डॉलरचा करार आज म्हणजेच शुक्रवारी होणार आहे. याच्या एक दिवस आधी गुरुवारी एलॉन मस्क यांनी ट्विटर विकत घेण्याबाबत मोठा खुलासा केला. त्यांनी सांगितले की, या डीलमागे त्याचा हेतू काय आहे? या प्लॅटफॉर्मवरील जाहिरातीबद्दल त्यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर एक पोस्ट प्रसिद्ध करून मत व्यक्त केले.
जाहिरातदारांच्या नावाने ट्विटरवर केली पोस्ट
एलॉन मस्क यांनी गुरुवारी मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटर विकत घेण्याच्या करारामागील हेतू स्पष्ट करणारी एक पोस्ट केली. यामध्ये त्यांनी जाहिरातीबद्दल त्यांचे काय मत आहे हेही सांगितले. त्यांनी पोस्टमध्ये लिहिले, "प्रिय ट्विटर जाहिरातदार... मला वैयक्तिकरित्या तुमच्यासोबत ट्विटर खरेदी करण्यामागची प्रेरणा व्यक्त करायची आहे. मी ट्विटर का विकत घेतले? याबद्दल बरीच चर्चा होती, मस्कने खुलासा केला की, त्यांनी ट्विटर विकत घेतले, जेणेकरून आपल्या विचारांना एक कॉमन डिजिटल जागा मिळू शकेल, जिथे विविध विचारसरणी आणि विश्वासांचे लोक कोणत्याही प्रकारच्या हिंसाचाराचा अवलंब न करता योग्य मार्गाने विश्वास ठेवू शकतील. तसेच चर्चा करण्यास सक्षम राहतील.
मस्क यांच्याकडून धोक्याचा उल्लेख
एलॉन मस्क यांनी पोस्टमध्ये पुढे लिहिले आहे की, सध्या एक मोठा धोका आहे की सोशल मीडिया कट्टर दक्षिणपंथी आणि कट्टर वामपंथी यांच्यात फूट पडेल आणि आपल्या समाजात अधिक द्वेष पसरवेल. बहुतेक पारंपारिक संस्थांनी अधिक क्लिक्समुळे याला वाव दिला आहे, परंतु असे करताना, संवादाची संधी कुठेतरी गमावली आहे. मस्क म्हणाले की, ट्विटरने "प्रत्येकाचे स्वागत केले पाहिजे" आणि युजर्सना त्यांना हवा असलेला अनुभव निवडण्यास सक्षम केले पाहिजे. याव्यतिरिक्त, मस्कने जाहिरातदारांना सांगितले की, त्यांना हे व्यासपीठ जगातील सर्वात प्रतिष्ठित जाहिरात व्यासपीठ बनवायचे आहे.
पैसे कमवणे हा हेतू नाही
एलॉन मस्क यांनी जाहिरातदारांना सांगितले की, ट्विटरसोबतचा करार पैसे कमावण्यासाठी केलेला नाही. मी हे डील "माणुसकीला मदत करण्यासाठी" केले आहे, जे मला आवडते. मी हे अत्यंत नम्रतेने करत आहे, कारण असे ध्येय गाठण्यात अयशस्वी होणे शक्य आहे. विशेष म्हणजे, डेलावेअर कोर्टाने एलॉन मस्कला सध्याच्या अटींवर शुक्रवार, 28 ऑक्टोबर 2022 पर्यंत ट्विटर करार अंतिम करण्यास सांगितले आहे. याच्या एक दिवस आधी त्यांनी ट्विटरवर ही पोस्ट प्रसिद्ध केली.
मस्कच्या आईने 'हा' संदेश दिला
एलॉन मस्कच्या ट्विटर पोस्टवर त्याची आई मेय मस्क (Maye Musk) यांनी ट्विट करताना एक मोठी गोष्ट सांगितली. मस्कची ही पोस्ट त्याच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर करत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, अप्रतिम संदेश... #Proud Mom