Putin On Modi : भारताच्या परराष्ट्र धोरणाची जगभर चर्चा होते. आता रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतिनही (Vladimir Putin) भारताच्या परराष्ट्र धोरणाचे कौतुक करण्यापासून स्वत:ला रोखू शकले नाहीत. गुरुवारी पुतिन यांनी पंतप्रधान मोदींचे (PM Modi) कौतुक केले आणि त्यांना खरे देशभक्त म्हटले. पुतिन म्हणाले की, पंतप्रधान मोदी हे अशा लोकांपैकी एक आहेत, ज्यांच्याकडे देशाच्या हितासाठी स्वतंत्र परराष्ट्र धोरण निवडण्याची ताकद आहे. ते म्हणाले की, भारत आणि रशिया यांच्यात काही दशकांपासून विशेष संबंध विकसित झाले आहेत.
पुतिन यांच्याकडून मोदींचे तोंडभरून कौतुक
रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी मॉस्को येथील वल्डाई डिस्कशन क्लबच्या 19 व्या वार्षिक बैठकीत या गोष्टी सांगितल्या. ते पुढे म्हणाले, 'भारताने आधुनिक राज्य अशी प्रचंड प्रगती केली आहे. भारताबद्दल आदर आणि कौतुकास कारणीभूत ठरणाऱ्या घडामोडी यातून घडल्या आहेत. पीएम मोदींचे कौतुक करताना ते पुढे म्हणाले, 'पीएम मोदींच्या नेतृत्वाखाली गेल्या काही वर्षांत बरेच सकारात्मक बदल करण्यात आले. साहजिकच ते देशभक्त आहे. त्यांची मेक इन इंडियाची कल्पना आर्थिक आणि नैतिकदृष्ट्या महत्त्वाची आहे.
आमचे विशेष नाते आहे.- पुतिन
पुतीन पुढे म्हणाले, 'भविष्य भारताचे आहे. सर्वात मोठी लोकशाही असल्याचा अभिमान मोदींना वाटू शकतो आणि आमचे विशेष नाते आहे. आमचे जवळचे नाते आहे.' पुतीन यांनी संरक्षण भागीदारी आणि वाढत्या व्यापार संबंधांचाही उल्लेख केला. पुतीन म्हणाले, "आमच्या काळात व्यापारात खूप वाढ झाली आहे." पंतप्रधान मोदींनी मला भारतासाठी खतांचा पुरवठा वाढवण्यास सांगितले आणि त्यात 7.6 पट वाढ झाली आहे. शेतीशी संबंधित व्यापार जवळपास दुपटीने वाढला आहे.
"भारत कोणत्याही देशाच्या दबावाखाली आला नाही"
समरकंदमध्ये SCO शिखर परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यात बैठक झाली. उर्जा आणि खत पुरवठा यावर लक्ष केंद्रित करणारे इतर मुद्दे येथे चर्चेचा अजेंडा होते. पुतिन म्हणाले, 'पंतप्रधान मोदी अशा लोकांपैकी एक आहेत जे स्वतंत्र परराष्ट्र धोरण राबवण्यास सक्षम आहेत. भारत कोणत्याही देशाच्या दबावाखाली आला नाही. मला खात्री आहे की भविष्यात भारताची मोठी भूमिका असेल. बैठकीत, पुतिन यांनी पाश्चात्य देशांवर जोरदार निशाणा साधला आणि ते म्हणाले की, ते जगावर वर्चस्व गाजवण्याच्या आशेने "धोकादायक आणि रक्तरंजित खेळ" खेळत आहेत.