मुंबई : अब्जाधीश एलॉन मस्क (Elon Musk) यांची टेस्ला नावाची इलेक्ट्रिक कारनिर्मिती (Tesla Electric Car Company) करणारी कंपनी आहे. इलेक्ट्रिक कारनिर्मिती (Electric Car) क्षेत्रातील ही एक विश्वासार्ह आणि अग्रगण्य अशी कंपनी आहे. आता हीच कंपनी भारतात गुंतवणूक करणार असल्याची माहिती समोर येत आहे. असे झाल्यास भारतात हजारो लोकांना रोजगार मिळू शकतो. तसेच देशात लाखोंची गुंतवणूक होऊ शकतो. मिळालेल्या माहितीनुसार या एप्रिल महिन्याच्या शेवटपर्यंत टेस्ला कंपनीचे एक शिष्टमंडळ भारतात येऊन कंपनी उभारण्यासाठी जागेचा शोध घेणार आहे. 


महाराष्ट्र, गुजरात, तमिळनाडूमध्ये जागा शोधणार


मिळालेल्या माहितीनुसार टेस्ला कंपनी भारतात इलेक्ट्रिक कारनिर्मिती करण्यासाठी एका प्लांटची स्थापना करणार आहे. हा कार प्लांट साधरण 2 ते 3 अब्ज डॉलरचा असणार आहे. विशेष म्हणजे टेस्लाचे शिष्टमंडळ एप्रिल महिन्याच्या शेवटपर्यंतच भारतात येऊ शकते. कारनिर्मितीसाठी पुरक वातावरण, सोईसुविधा असणाऱ्या प्रदेशाचा शोध या शिष्टमंडळाकडून घेतला जाणार आहे. हे शिष्टमंडळ महाराष्ट्र, गुजरात, तमिळनाडू या राज्यांत जाऊन योग्य जागेचा शोध घेणार आहे. 


बाजारपेठ तब्बल 24 .3 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता


भारतीय वाणिज्य मंत्रालयाने आपल्या इलेक्ट्रिक व्हेइकल धोरणात नुकताच बदल केला आहे. असे असताना टेस्ला कंपनीचे शिष्टमंडळ भारतात येणार आहे. ऑटोमोबाईल क्षेत्राचा विचार करायचा झाला तर भारत या क्षेत्रातील सर्वांत मोठी बाजारपेठ आहे. भारतातील ऑटोमोबाईल क्षेत्राची बाजारपेठ ही सध्या 12.5 लाख कोटी रुपये आहे. येत्या 2030 सालापर्यंत ही बाजारपेठ तब्बल 24 .3 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. भारताच्या एकूण जीडीपीमध्ये ऑटोमोबाईल क्षेत्राचा वाटा हा 7.1 टक्के आहे. 


सरकारकडून पुरक सुविधा निर्माण करण्याचा प्रयत्न


सध्या देशात हरियाणा राज्यात वाहनिर्मितीच्या काही कंपन्या आहेत. या राज्यासह राजधानी दिल्लीच्या आजूबाजूला आपला प्लांट उभारण्याचा विचार टेस्लाकडून केला जाऊ शकतो. चीन हा देश भारताचा उद्योग आणि राजनैतिक पातळीवर प्रतिस्पर्धी आहे. याच चीनला तोंड देण्यासाठी इलेक्ट्रिक व्हेइकलच्या निर्मितीसाठी भारताने आतापर्यंत अनेक सुविधा निर्माण केलेल्या आहेत. अशा वाहनांची निर्मिती करण्याचे प्रमाण वाढावे म्हणून सरकारने आतापर्यंत कोट्यवधी रुपयांचे अनुदान दिलेले आहे. 


दरवर्षी 5 लाख वाहनांची निर्मिती होणार


दरम्यान, टेस्ला कंपनीच्या या प्लांटविषयी निश्चित माहिती मिळू शकली नसली तरी ही कंपनी भारतात 2 ते 3 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याची शक्यता आहे. हा प्लांट पूर्ण क्षमतेने कार्यरत झाल्यास त्याच्या माध्यमातून दरवर्षी 5 लाख वाहनांची निर्मिती केली जाईल, असे सांगितले जात आहे. त्यामुळे हा प्लांट भारतात नेमका कधी येणार, त्याच्या उभारणीचे काम प्रत्यक्ष कधी चालू होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.