Tax Collection : केंद्राच्या प्रत्यक्ष कर संकलनात मोठी वाढ झाली आहे. 30 ऑगस्टपर्यंत 4.88 ट्रिलियन रुपयांचे कर संकलन झाले आहे. मागील वर्षीच्या या कालावधीच्या तुलनेत हे कर संकलन (Tax Collection) 33 टक्क्यांनी अधिक आहे. मागील वर्षी ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत 3.6 ट्रिलियन रुपयांचे प्रत्यक्ष कर संकलन झाले होते, अशी माहिती केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे (CBDT) अध्यक्ष नितीन गुप्ता यांनी दिली. प्रत्यक्ष कर संकलनाचा हा दर असाच राहिला तर, आर्थिक वर्ष 2023 मधील 14.20 ट्रिलियन रुपयांचे उद्दिष्ट ओलांडू शकतो असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
'बिझनेस स्टॅण्डर्ड' सोबत बोलताना सीबीडीटीचे अध्यक्ष नितीन गुप्ता यांनी सांगितले की, कर परताव्याबाबतची आकडेमोड केल्यानंतरही आमच्याकडे असलेला कर संकलनाची आकडेवारी अधिक चांगली आहे. कर संकलनाबाबतचा हा ट्रेंड कायम राहिल्यास आपल्याकडे अधिक चांगला कर जमा होऊ शकतो. कर संकलनाचे उद्दिष्ट गाठू शकतो असेही त्यांनी सांगितले.
आर्थिक वर्ष 2023 साठी 14.20 ट्रिलियन रुपयांचे कर संकलन करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी 7.2 ट्रिलियन रुपये हे कॉर्पोरेट करातून आणि 7 ट्रिलियन रुपये हे वैयक्तिक आयकर आणि सिक्युरिटीज ट्रांजेक्शन टॅक्ससह विविध उत्पन्नांवरील करातून अपेक्षित आहेत.
गुप्ता यांनी सांगितले की, या वर्षी जमा झालेला कॉर्पोरेट कर गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 25-26 टक्क्यांनी अधिक आहे. कोरोना महासाथीमुळे निर्माण झालेल्या मंदीतून अर्थव्यवस्था बाहेर पडत असल्याचे चिन्ह आहे.
एप्रिल ते जून 2022 दरम्यानच्या कालावधीतील कॉर्पोरेट क्षेत्राचे उत्पन्न हे दुहेरी आकड्यात आहे. बिझनेस स्टॅण्डर्डच्या एका वृत्तानुसार, विविध क्षेत्रातील सूचीबद्ध असलेल्या 2981 कंपन्यांनी जाहीर केलेल्या ताळेबंदानुसार, जून तिमाहीत मागील वर्षीच्या तुलनेत निव्वळ नफा 22.4 टक्क्यांनी वाढला आहे. जून 2022 च्या तिमाहीत या कंपन्यांचा नफा 2.24 ट्रिलियन रुपये इतका झाला आहे. बँका, बिगर बँकींग सेवा, एफएमसीजी, ऑईल अॅण्ड गॅस कंपन्यांच्या नफ्यात वाढ झाली असल्याचे समोर आले आहे.
महागाईचा वाढता दबाव आणि रशिया-युक्रेन युद्धामुळे पुरवठा-मागणी साखळीत व्यत्यय निर्माण झाला आहे. तर, दुसऱ्या बाजूला लोककल्याणकारी योजनेवर वाढता खर्च यामुळे आर्थिक वर्ष 2023 मधील वित्तीय तूट सकल राष्ट्रीय उत्पादनांच्या 6.4 टक्के राखण्यासाठी केंद्र सरकारला कर संकलनाकडून अधिक अपेक्षा आहेत.