Crude Oil Price Hike : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर पुन्हा एकदा वधारले आहेत. तेल उत्पादक देशांची संघटना असलेल्या ओपेकने (OPEC) कच्च्या तेलाचे उत्पादन वाढवण्याचा निर्णय घेतल्यानंतरही आंतरराष्ट्रीय बाजारात  कच्च्या तेलाचा दर 111 डॉलर प्रति बॅरल इतका झाला  आहे. ब्रेंट क्रूड ऑइलचा दर 111 डॉलर प्रति बॅरल या दरावर व्यवहार करत आहे. कच्च्या तेलाच्या दरात वाढ झाल्याने देशात इंधन दरवाढीची टांगती तलवार आहे. 


इंधन दर वाढण्याची भीती


कच्च्या तेलाचे दर 110 डॉलर प्रति बॅरलपेक्षा कमी राहिल्यास पेट्रोल, डिझेलचे दर वाढवण्याची शक्यता नसल्याचे मुख्य आर्थिक सल्लागारांनी याआधी म्हटले होते. आता कच्च्या तेलाचा दर 110 डॉलर प्रति बॅरलहून अधिक झाल्याने ग्राहक, सरकार आणि सार्वजनिक तेल कंपन्यांना याचा भार सहन करावा लागणार आहे. 


याआधीच इंधन दरवाढीमुळे सामान्यांचा खिसा रिकामा होत आहे. पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर  22 मार्चपासून इंधनाचे दर वाढण्यास सुरुवात झाली. 6 एप्रिल 2022 पर्यंत पेट्रोल, डिझेलच्या दरात प्रति लीटर किमान 10 रुपयांची दरवाढ झाली आहे. मागील एक महिनाभरापासून इंधन दरात कोणतीही दरवाढ झाली नाही. 


मुंबईमध्ये पेट्रोलचे दर 120.41 रुपये प्रतिलिटर तर डिझेलचे दर 104.77 रुपये प्रतिलिटर इतके आहे. देशाची राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोल 105.41 रुपये प्रतिलिटर आणि डिझेलचे दर 96.67 रुपये प्रतिलिटर आहे. याशिवाय कोलकातामध्ये पेट्रोलचा दर 115.12 रुपये प्रतिलिटर आणि डिझेलचा दर 99.83 रुपये प्रतिलिटर आहे. चेन्नईमध्ये पेट्रोलचे दर 110.85 रुपये प्रतिलिटर तर डिझेलचे दर 100.94 रुपये प्रतिलिटर  आहे. 


इंधन दरवाढीवर नियंत्रण मिळवण्यासाठी नोव्हेंबर 2021 मध्ये केंद्र सरकारने पाच रुपयांनी करात कपात केली होती. केंद्र सरकारप्रमाणे राज्यांनी व्हॅट कर कमी करावा अशी मागणी भाजपकडून करण्यात येत होती. तर, केंद्राने मागील सात वर्षात वाढवलेले जवळपास 250 टक्के कर कमी करण्याची मागणी विरोधी पक्षांनी केली आहे. इंधन दरवाढीवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू असताना दुसरीकडे सामन्यांचे बजेट बिघडले आहे.