Crude Oil Price : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात (Crude Oil Price) मोठी घसरण झाली आहे. यंदाच्या वर्षात पहिल्यांदाच कच्च्या तेलाचे दर 80 डॉलर प्रति बॅरल खाली गेले आहेत. मागील काही दिवसांपासून कच्च्या तेलाच्या दरात घसरण होत आहे. जानेवारी 2022 नंतर ही मोठी घसरण आहे. या घसरणीचा फायदा भारताला होण्याची शक्यता आहे. मात्र, पेट्रोल-डिझेलच्या दरात कितपत कपात होते, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. 


आंतरराष्ट्रीय बाजारात WTI क्रूड ऑईलची किंमत 78 डॉलर प्रति बॅरल इतकी झाली आहे. सध्या कच्च्या तेलाचे दर 78.66 डॉलर प्रति बॅरल झाली आहे. ब्रेंट क्रूड ऑईलचे दरही घसरले आहेत. ब्रेंट क्रूड ऑईलचा दर 85 डॉलर प्रति बॅरल इतका झाला आहे. 24 जानेवारी 2022 नंतरचा हा सर्वाधिक नीचांकी दर आहे. 


दर आणखी घसरणार?


अमेरिकन अर्थव्यवस्थेवर आर्थिक मंदीचे सावट आहे. वाढत्या महागाईला आळा घालण्यासाठी फेडरल रिझर्व्हने व्याज दरात वाढ केली आहे. आगामी काळात व्याज दरात आणखी वाढ होण्याचे संकेत फेडरल रिझर्व्हने दिले आहेत. त्यामुळे जागतिक शेअर बाजारात विक्रीचा सपाटा सुरू आहे. महाग होत असलेला डॉलर आणि जगातून कच्च्या तेलाची कमी झालेली मागणी याच्या परिणामी कच्च्या तेलाचे दर आणखी कमी झाले आहेत. 


अमेरिका, युरोपमध्ये असलेले मंदीचे सावट आणि चीनमधून कच्च्या तेलाची घटलेली मागणी याचा परिणाम कच्च्या तेलाच्या दरावर झाला आहे. 


भारताला दिलासा?


कच्च्या तेलाच्या दरात झालेल्या मोठ्या घसरणीचा फायदा भारताला होण्याची शक्यता आहे. भारत आपल्या मागणीच्या जवळपास 80 टक्के कच्चं तेल आयत करतो.. कच्च्या तेलाच्या दरात घट झाल्यास डॉलरची मागणी कमी होईल. त्यामुळे डॉलरच्या तुलनेत रुपया आणखी मजबूत होईल. Moody's Analytics नुसार, कच्च्या तेलाचे दर 70 डॉलर प्रति बॅरल इतका होण्याची शक्यता आहे. 


पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार?


कच्च्या तेलाच्या दरात सातत्याने घसरण होत असल्याने पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात होईल का, याकडे अनेकांचे लश्र लागले आहे. महागाईचा दर कमी करण्यासाठी इंधन दरात कमी करण्याची मागणी सातत्याने केली जात आहे. दिवाळीचा सण आणि आगामी निवडणुका लक्षात घेऊन इंधन दर कमी करण्याबाबत सरकारकडून घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: