Corrupt Indian Billionaire: एकेकाळी मोठी संपत्ती, किर्ती असलेले काही भारतीय अब्जाधीश (Billionaire) आता कंगाल झाले आहेत. काही काळातच ते उद्ध्वस्त झाले आहेत. एकेकाळी हे अब्जाधीश यशाच्या शिखरावर होते. कारण त्यावेळी त्यांच्याकडं सर्व काही होते. जाणून घेऊयात हिरो ते झिरो झालेल्या अब्जाधिशांबद्दल माहिती. 


चुकीच्या मार्गाने पैसा कमवायचाच हेतू असेल, तर गरीब असो वा श्रीमंत, एक दिवस फसणारच. आपल्या देशातही असे काही लोक आहेत, जे एकेकाळी यशाच्या शिखरावर होते. कारण त्यावेळी त्यांच्याकडे सर्व काही होते, संपत्ती, प्रसिद्धी पण काही वेळातच सर्व काही उद्ध्वस्त झाले. देशातील 7 अब्जाधीशांच्या बाबतीतही असेच घडले आहे. एकेकाळी हे अब्जाधीश असणारे लोक अनेकांचे आदर्श होते, पण आता त्यांची नावे बदनाम झाली आहेत. कोट्यवधींचे व्यवसाय बुडाले आहेत.  


चंदा कोचर


काही वर्षांपूर्वी चंदा कोचर या ICICI बँकेच्या CEO आणि व्यवस्थापकीय संचालक होत्या. पदाचा गैरवापर केल्याचा आरोप त्यांच्यावर असून, तपास सीबीआयपर्यंत पोहोचला. चंदा कोचर यांनाही लाचखोरी प्रकरणात अटक करण्यात आली आहे. त्या सध्या जामिनावर बाहेर आहेत. चंदा कोचर यांच्यावर 64 कोटींची लाच घेतल्याचा आरोप आहे. सीबीआयच्या म्हणण्यानुसार, चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांनी केवळ 11 लाख रुपये देऊन 5.3 कोटी रुपयांचा फ्लॅट खरेदी केला होता. व्हिडिओकॉन ग्रुपच्या कंपन्यांना कर्ज देण्याच्या बदल्यात लाच घेतल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर आहे. कर्जाच्या बदल्यात चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांच्या नु पॉवर लिमिटेडमध्ये 64 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली होती. आयसीआयसीआय बँकेने व्हिडिओकॉन समूहाला 3250 कोटी रुपयांचे कर्ज दिल्याचा दावा तपास यंत्रणेने केला आहे.


वेणुगोपाल धूत


व्हिडिओकॉन ग्रुपचे प्रवर्तक वेणुगोपाल धूत हेही फसवणूक प्रकरणात तुरुंगात गेले आहेत. ICICI बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर यांच्यावर व्हिडीओकॉन समूहाला कर्ज देण्याबाबत अनुकूलता दाखवल्याचा आरोप आहे. त्यानंतर व्हिडिओकॉन ग्रुपने चंदा कोचर यांच्या कुटुंबाला आणखी एका मार्गाने फायदा करून दिला. आयसीआयसीआय बँकेच्या फसवणुकीप्रकरणी सुमारे 70 वर्षीय वेणुगोपाल धूत यांनाही अटक करण्यात आली होती. फोर्ब्स मासिकानुसार, 2015 मध्ये धूत यांची संपत्ती 1.19 अब्ज डॉलर होती. त्यावेळी ते भारतातील 61 व्या क्रमाकांचे सर्वात श्रीमंत व्यक्ती होते. 2018 मध्ये, व्हिडिओकॉन कंपनीने स्वतः NCLT मध्ये दिवाळखोरी प्रक्रियेसाठी अर्ज केला होता. कंपनी अजूनही 'व्हिडिओकॉन' च्या रूपाने भारतात पहिला रंगीत टीव्ही लॉन्च करण्याचा दावा करते. पण काही वेळातच व्हिडिओकॉनचे साम्राज्य विस्कटले. सीबीआयने चंदा कोचर यांच्यावर व्हिडिओकॉन समुहाला सुमारे 3 हजार कोटी रुपयांचे कर्ज देताना अनियमितता केल्याचा आरोप केला होता.


मलविंदर सिंह आणि शिविंदर सिंह


एकेकाळी मलविंदर सिंह आणि शिविंदर सिंह यांची रॅनबॅक्सी लॅबोरेटरीज ही प्रसिद्ध कंपनी होती. 2015 मध्ये, रॅनबॅक्सीचे प्रवर्तक मलविंदर सिंग आणि शिविंदर सिंग हे भारतातील सर्वात श्रीमंत लोकांच्या फोर्ब्सच्या यादीत संयुक्तपणे 35 व्या स्थानावर होते. जेव्हा त्यांची संपत्ती 2.5 अब्ज डॉलर इतकी होती. आता हे दोघे निराधार झाले आहेत. फसवणुकीच्या आरोपाखाली दोघेही तुरुंगात गेले आहेत.या दोघांनी रॅनबॅक्सी लॅबोरेटरीज ही कंपनी जपानच्या द सांक्यो या कंपनीला 9,576 कोटी रुपयांना विकली. त्यांनी दिलेले पैसे त्यांनी चुकीच्या पद्धतीने खर्च केले. परत कर्जात डूबते गेले आणि एक दिवस रैनबैक्सी कंपनी देखील विकली. या दोघांवर 2016 मध्ये एकूण कर्ज हे 13000 कोटी रुपयांचे होते. 


विजय माल्ल्या 


विजय माल्ल्या यांना कोण ओळखत नाही? मल्ल्या लक्झरी लाइफ जगण्यासाठी ओळखला जातो. देशातील बँकांची फसवणूक करून तो फरार झाला आहे. देशातील 17 बँकांची सुमारे 9 हजार कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. त्याच्या अनेक मालमत्तांचा भारतात लिलाव झाला आहे. एकेकाळी विजय मल्ल्या यांचे एअरलाइन्ससह अनेक मोठे उद्योग होते. पण आता ते उद्ध्वस्त झाले आहे. माल्ल्या मार्च 2016 पासून ब्रिटनमध्ये आहे. माल्ल्याला परत आणण्यासाठी भारत सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे.


मेहुल चोक्सी  


2018 मध्ये अचानक मेहुल चोक्सीचे नाव चर्चेत येऊ लागले आहेत. कारण, त्यामुळे भारतीय बँकिंग व्यवस्था हादरली. पंजाब नॅशनल बँकेची 14 हजार कोटी रुपयांची फसवणूक करून मेहुल चोक्सी फरार झाला आहे. सुमारे 6 वर्षांपूर्वीपर्यंत त्यांची एकूण संपत्ती 1150 कोटी रुपये होती. पण फसवणुकीमुळं सर्व काही उद्ध्वस्त झाले. आज तो देशातूनही फरार आहे. मेहुल चोक्सीसह त्याचा पुतण्या नीरव मोदी 13,500 कोटी रुपयांच्या पीएनबी घोटाळ्यात आरोपी आहेत. मेहुल चोक्सीने 1996 मध्ये गीतांजली ग्रुपची स्थापना केली. गीतांजलीचे अजूनही अनेक शहरांमध्ये स्टोअर्स आहेत. चोक्सीला डिसेंबर 2017 मध्ये अँटिग्वा आणि बारबुडाचे नागरिकत्व मिळाले होते. पीएनबीसोबत झालेल्या फसवणुकीचे हे प्रकरण जानेवारी 2018 मध्ये उघडकीस आले होते.


नीरव मोदी


प्रसिद्ध पीएनबी घोटाळ्याचा सूत्रधार नीरव मोदी आज प्रत्येक पैशावर अवलंबून आहे. नीरव मोदीची कहाणीही मेहुल चोक्सीसारखीच आहे. 2018 पूर्वी बहुतेक लोक त्याला श्रीमंत म्हणून ओळखत नव्हते, परंतु जेव्हा पंजाब नॅशनल बँक त्याच्यामुळे दिवाळखोर झाली तेव्हा लोक त्याच्या फसवणुकीबद्दल देशभर बोलू लागले. गुजरातमधील हिरे व्यापारी अशी त्यांची ओळख होती. जिथे अवघ्या 6 वर्षांपूर्वी त्यांची एकूण संपत्ती 13 हजार कोटींहून अधिक होती, तिथे आता ते 30 हजार कोटींहून अधिकचे कर्जदार झाले आहेत. नीरव मोदी सध्या लंडन पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याच्याविरुद्ध मनी लाँड्रिंग, गुन्हेगारी कट आणि फसवणूक, सरकारी कर्मचाऱ्यांना त्रास देणे असे अनेक गुन्हे दाखल आहेत.


राणा कपूर


राणा कपूर येस बँकेचे संस्थापक आणि माजी व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ होते. मात्र आता ते जेलमध्ये आहेत. तब्बल 4 वर्षानंतर राणा कपूर यावर्षी एप्रिलमध्ये तुरुंगातून बाहेर आले आहेत. आपल्या पदाचा गैरवापर करून कुटुंबाला फायदा करून दिल्याप्रकरणी राणा कपूरविरोधात खटला सुरू आहे. त्यामुळं बँकेचे मोठे नुकसान झाले. यामुळे येस बँक एकेकाळी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर होती. सीबीआयने मार्च 2020 मध्ये राणा कपूरविरुद्ध फसवणूक आणि गुन्हेगारी कट रचल्याचा गुन्हा दाखल केला होता. त्याचबरोबर ईडीचीही चौकशी सुरू आहे. येस बँकेकडून काही कंपन्यांना मोठे कर्ज मिळवून देण्यासाठी राणा कपूर आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी आणि इतरांनी सुमारे 4300 कोटी रुपयांची लाच घेतल्याचा ईडीचा आरोप आहे. ईडीच्या म्हणण्यानुसार, राणा कपूर अध्यक्ष असताना येस बँकेने सुमारे 30,000 कोटी रुपयांची कर्जे मंजूर केली होती, त्यापैकी 20,000 कोटी रुपयांचे बुडित कर्जात रूपांतर झाले होते.


महत्वाच्या बातम्या:


विजय माल्या, नीरव मोदी आणि मेहुल चोकसी यांची जवळपास 18 हजार कोटींची संपत्ती जप्त, खातेधारकांना मोठा दिलासा