Maharashtra Bandh नाशिक : राज्यात काही लोकांना मुख्यमंत्रीपदाची खुर्ची मिळवण्यासाठी एवढी घाई झाली आहे की, लोकांच्या दुःखातही त्यांना राजकीय संधी दिसतेय. त्यामुळे अशी विकृती वेळीच ओळखली पाहिजे.  लाडकी बहीण योजना रोखण्यासाठी देखील विरोधक कोर्टापर्यंत गेले होते. मात्र, तिथे देखील त्यांना न्यायालयाने फटकारलं. असाच प्रकार आज देखील झाला असून महाराष्ट्र बंद (Maharashtra Bandh) करणाऱ्यांना कोर्टाने परत एकदा चपराक लावली आहे. असल्याची प्रतिक्रिया राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिली आहे. ते नाशिक येथे बोलत होते.


राज्यातील महिला अत्याचारांच्या घटनांचा निषेध नोंदवण्यासाठी विरोधी पक्षांनी महाराष्ट्र बंदची (Maharashtra Bandh) हाक दिली आहे. दरम्यान, वकील गुणरत्न सदावर्तेंसह (Gunaratna Sadavarte) इतरांनी महाराष्ट्र बंदविरोधात मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) याचिका दाखल केली होती. याबाबत तातडीची सुनावणी पार पडलीय. "कोणत्याही राजकीय पक्षाला बंद करण्याची परवानगी नाही. जर कोणी तसा प्रयत्न करत असेल तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी", असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. या निर्णयावर भाष्य करताना मुख्यमंत्र्यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.


 मृतांच्या टाळूवरचे लोणी खाण्यासारखा प्रकार    


बदलापूरची घटना दुर्दैवी आहे. त्याबद्दल आम्हाला देखील वेदना झाल्या आहेत. याप्रकरणी दोषीवर कठोरात कठोर कारवाई करून त्याला फाशीची शिक्षा व्हावी, यासाठी  सरकार कोर्टात सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. ज्याप्रमाणे घटना दुर्दैवी आहे त्यांच प्रमाणे त्याचे राजकारण करणे हे ही अतिशय दुर्दैवी आहे. हा सर्व मृतांच्या टाळूवरचे लोणी खाण्यासारखा प्रकार आहे. म्हणूनच कोर्टाने महाराष्ट्र बंद हा बेकायदेशीर ठरवला असून कोर्टाने एक प्रकारे विरोधकांना परत एकदा चपराक लावली असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. यापूर्वी देखील न्यायालयाने महाराष्ट्र बंद संदर्भात निर्णय घेतले होते आणि दंडही लावले होते. असे असतानाही विरोधी पक्ष महाराष्ट्र बंद करण्याचा आग्रह त्यांनी धरला होता. मात्र, महाराष्ट्र बंदच्या निमित्ताने सर्वसामान्य माणूसच या बंदमध्ये भरडला जातो. माननीय न्यायालयाने जो निर्णय दिला आहे, त्याची अंमलबजावणी सरकार आपल्या पातळीवर करेल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.


आणखी वाचा