New Rule From Today: आजपासून नवा महिना म्हणजेच, मे महिना सुरू झाला आहे. प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला जसे काही बदल होतात, तसेच काही बदल आजही पाहायला मिळत आहे. आज 1 मे 2023 रोजी देशात अनेक महत्त्वाचे बदल (New Rule From Today) झाले आहेत. एलपीजीच्या दरात कपात (Commercial LPG Cylinder) करण्यात आली आहे. वस्तू आणि सेवा कर (GST) ते म्युच्युअल फंडाशी (Mutual Fund) संबंधित नियमांमधील बदल आजपासून लागू होणार आहेत. या अशा गोष्टी आहेत ज्यांचा थेट संबंध तुमच्या दैनंदिन जीवनाशी होत आहे, जाणून घेऊयात 1 मे पासून होणार्‍या चार मोठ्या बदलांबद्दल...


एलपीजीच्या दरांत बदल


पेट्रोलियम कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजी सिलिंडरच्या (LPG) किमती निश्चित करतात. कंपन्यांनी या महिन्यातही व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमती 171 रुपयांनी कमी केल्या आहेत. पाटणा, रांची ते चेन्नईपर्यंत व्यावसायिक स्वयंपाकाचा गॅस सिलेंडर 171.50 रुपयांनी स्वस्त झाला आहे. आजपासून दिल्लीत 19 किलोंच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत 1856.50 रुपयांवर गेली आहे. यापूर्वी 1 एप्रिल रोजी सरकारनं 19 किलोंच्या व्यावसायिक सिलिंडरची किंमत 91.50 रुपयांनी कमी केली होती.


मुंबई मेट्रोच्या भाड्यात 25 टक्के सूट


1 मे पासून, मुंबई मेट्रो लाइन्स 2A आणि 7 या मार्गांवरुन प्रवास करणाऱ्या 65 वर्षांवरील नागरिक, दिव्यांग आणि इयत्ता बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी प्रवास शुल्कात 25 टक्के सवलत जाहीर केली आहे. या लाईन्स महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड (MMMOCL) आणि मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट अथॉरिटी (MMRDAA) द्वारे चालवल्या जातात. याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला आवश्यक कागदपत्रं दाखवावी लागतील. 


GST नियमांमध्ये बदल


1 मे पासून व्यावसायिकांसाठी जीएसटीमध्ये मोठे बदल होणार आहेत. नव्या नियमांनुसार, आता 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त उलाढाल असलेल्या कंपन्यांसाठी, व्यवहाराची पावती 50 दिवसांच्या आत इनव्हॉइस रजिस्ट्रेशन पोर्टलवर (IRP) अपलोड करावी लागेल. हे करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. या कामासाठी अद्याप कोणतीही मुदत निश्चित करण्यात आलेली नाही.


म्युच्युअल फंड KYC


बाजार नियामक संस्था सेबी (SEBI) नं म्युच्युअल फंड कंपन्यांना म्युच्युअल फंडांमध्ये  (Mutual Fund) गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदार त्याच ई-वॉलेटचा (E-Wallet) वापर करत आहेत, ज्याचं KYC पूर्ण आहे, याची खात्री करुन घ्या. हा नियम 1 मेपासून लागू होणार आहे. यानंतर गुंतवणूकदार केवळ केवायसीसह ई-वॉलेटद्वारे गुंतवणूक करू शकतात. केवायसीसाठी, तुम्हाला तुमचा पॅन क्रमांक, मोबाईल नंबर आणि बँक तपशील द्यावा लागेल. या सर्व तपशीलांसह, केवायसीसाठी एक फॉर्म भरावा लागेल.


PNB ग्राहकांसाठी मोठा बदल


देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकांपैकी एक असलेल्या पंजाब नॅशनल बँकेनं एटीएम व्यवहारांशी संबंधित नियमांमध्ये बदल करण्याची घोषणा केली आहे. नवे नियम 1 मे पासून लागू होणार आहेत. एटीएममधून पैसे काढताना पंजाब नॅशनल बँकेच्या ग्राहकांच्या खात्यात शिल्लक नसल्यास, व्यवहार अयशस्वी झाल्यानंतर बँकेकडून 10 रुपयांसह जीएसटी घेतला जाईल. पंजाब नॅशनल बँकेनं आपल्या वेबसाईटवर नोटीस जारी करताना ही माहिती दिली आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Petrol Price Today: LPGच्या दरांत कपात, पेट्रोल-डिझेलचे दरही बदलले? झटपट चेक करा आजच्या किमती