1st May In History: आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. आज मराठी भाषिकांसाठीचा आनंदाचा, उत्साहाचा दिवस आहे. आज महाराष्ट्र दिन आहे. तर, कामगारांच्या न्याय अधिकारासाठी लढलेल्या संघर्षाचे स्मरण करण्याचा दिवस म्हणून 'कामगार दिवस' साजरा केला जातो. आजच्या दिवशी कोकण रेल्वे राष्ट्राला अर्पण करण्यात आली होती. सुप्रसिद्ध गायक मन्ना डे यांचा आज जन्मदिवस आहे. त्याशिवाय इतर मोठ्या, महत्त्वाच्या घडामोडी घडल्यात.
महाराष्ट्र दिन Maharashtra Din
महाराष्ट्र आणि मराठी मनाच्या दृष्टीने आनंदाचा, अभिमानाचा आहे. आज महाराष्ट्र दिन आहे. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे यामागणीसाठी सुरू केलेल्या आंदोलनाला यश मिळाले. 1 मे 1960 रोजी स्वतंत्र महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. हा दिवस मराठी माणसाचा आहे आणि तो मोठ्या उत्साहात राज्यभर साजरा केला जातो. या दिवशी ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या 106 हुतात्म्यांचे स्मरण या दिवशी केले जाते. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत बेळगाव, कारवार, निपाणी हे जिल्हेदेखील महाराष्ट्रात यावे ही मागणी होती. मात्र, ही मागणी अद्यापही पूर्ण झाली नाही. त्यासाठी सीमावासियांचा लढा सुरू आहे.
आंतरराष्ट्रीय कामगार दिन International Labour Day
जागतिक कामगार दिन हा जगभरातील कामगार चळवळींच्या गौरवासाठी साजरा केला जाणारा दिवस आहे. हा दिवस साजरा करण्यास 1 मे 1886 पासून सुरुवात झाली. कोणत्याही समाजाच्या आणि देशाच्या विकासात कामगारांची भूमिका महत्वपूर्ण राहिली आहे. कामगारांच्या या योगदानाची दखल घेऊन त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून जगभर 1 मे या दिवशी कामगार दिवस साजरा केला जातो. जगभरातील 80 हून अधिक देशांमध्ये हा दिवस साजरा करण्यात येतो.
19 व्या शतकात भांडवलशाही विकसित होत असताना कामगारांना 12 तासांहून अधिक काम करावे लागत असे. त्या तुलनेत त्यांना अंत्यत कमी वेतन असे. आठ तास काम या मागणीसाठी जगभरात विविध ठिकाणी आंदोलने, लढे झाले. याबाबतची पहिली मागणी 21 एप्रिल 1856 रोजी ऑस्ट्रेलियातील कामगारांकडून आली तेव्हापासून हा दिवस तेथे सुट्टी म्हणून जाहीर झाला. ऑस्ट्रेलियातील कामगारांच्या मार्गाने जात अमेरिका आणि कॅनडातील कामगार, डाव्या संघटनांनी 1 मे 1886 रोजी मोर्चे, निदर्शने यांची मालिका सुरू केली. अशाच एका मोर्चाला पांगवताना 4 मे 1886 रोजी अमेरिकेतील शिकागोमध्ये सहा आंदोलनकर्त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेच्या स्मरणार्थ 1 मे 1890 रोजी आंतरराष्ट्रीय आंदोलनाचे आयोजन करण्याची मागणी रेमंड लेविन याने 'दुसऱ्या आंतरराष्ट्रीय'च्या १९८९ च्या पॅॅरीस परिषदेत केली. त्या परिषदेत 1 मे 1890 हा जागतिक कामगार एकता दिवस म्हणून साजरा करण्याचे निश्चित झाले.
1919: पार्श्वगायक मन्ना डे यांचा जन्म Manna Dey Birth Anniversary
आपल्या जादूई आवाजाने अनेक दशके रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे पार्श्वगायक प्रबोधचंद्र डे अर्थात मन्ना डे यांचा जन्म दिवस. मन्ना डे यांना 1943 मध्ये त्यांना सुरैयासोबत तमन्ना चित्रपटात पार्श्वगायिका म्हणून गाण्याची संधी मिळाली. याआधी त्यांनी 'रामराज्य' या चित्रपटात कोरस म्हणून गाणं गायलं होतं. विशेष म्हणजे महात्मा गांधी यांनी पाहिलेला हा एकमेव चित्रपट होता.
मन्ना डे यांनी केवळ शब्दच गायले नाहीत, तर शब्दांमागील दडलेल्या भावनाही त्यांच्या गायकीतून सुंदरपणे समोर आणल्या. कदाचित याच कारणामुळे प्रसिद्ध हिंदी कवी हरिवंशराय बच्चन यांनी त्यांच्या अजरामर कलाकृती मधुशालाला आवाज देण्यासाठी मन्ना डे यांची निवड केली. संगीत दिग्दर्शक सलील चौधरी यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली काबुलीवाला चित्रपटाच्या यशानंतर मन्ना डे 1961 मध्ये प्रसिद्धीस आले.
1922 : स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार आणि समाजवादी नेते मधु लिमये यांचा जन्म
भारताच्या राजकारणात मधू लिमये यांनी आपला वेगळा ठसा उमटवला. महाराष्ट्रातील या नेत्याने बिहारमध्ये आपली राजकीय कारकीर्दीचा फुलवली होती. ते बिहारमधून चारवेळा खासदार झाले होते. राममनोहर लोहिया यांचे ते अनुयायी होते. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात, गोवा मुक्तिसंग्रामात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
मधू लिमये यांना स्वातंत्र्य चळवळीतील प्रशंसनीय योगदानाबद्दल भारत सरकारने स्वातंत्र्य सैनिक पेन्शन देऊ केली होती. परंतु त्यांनी ती नम्रपणे नाकारली. माजी खासदारांना देण्यात येणारी पेन्शनही त्यांनी स्वीकारली नाही. निस्वार्थीपणे आणि त्यागाच्या भावनेने देशाची सेवा करणारे वचनबद्ध समाजवादी म्हणून मधु लिमये सदैव स्मरणात राहतील.
1955 : महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रांचा जन्म Anand Mahindra Birthday
1 मे 1955 रोजी मुंबईत जन्मलेले आनंद महिंद्रा हे उद्योगपती कुटुंबातील तिसरी पिढी होते. त्यांचा जन्म हरीश आणि इंदिरा महिंद्रा यांच्या पोटी झाला. त्यांचे आजोबा जगदीश महिंद्रा, महिंद्रा आणि महिंद्र (M&M) च्या समुहाचे सहसंस्थापक होते. 4 एप्रिल 1991 रोजी आनंद महिंद्रा M&M Ltd चे उप व्यवस्थापकीय संचालक झाले. त्यावेळी कंपनीसाठी ही एक नवीन सुरुवात होती. 1991 मध्ये जेव्हा त्यांना M&M च्या कांदिवली कारखान्याचे काम सोपवण्यात आले तेव्हा आनंद महिंद्रा यांच्यासमोर सर्वात मोठे आव्हान होते.
आनंद महिंद्रा यांच्या महिंद्रा ग्रुपचे नाव भारतातील 10 सर्वात मोठ्या कंपन्यांमध्ये गणले जाते. महिंद्रा ही कंपनी आनंद यांचे आजोबा आणि त्यांच्या भावांनी पंजाबमधील लुधियाना शहरातून सुरू केली होती. याच कंपनीची धुरा आता आनंद महिंद्रा यशस्वीपणे संभाळत आहेत. भारतातील ऑटो सेक्टरमध्ये महिंद्रा कंपनीचे नाव आघाडीवर आहे.
1962 : महाराष्ट्रातील जिल्हा परिषदांची स्थापना
नाईक समितीच्या शिफारशिनुसार महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समितीअधिनियम इ.स. 1961 कलम क्र.6 नुसार प्रत्येक जिल्ह्यासाठी नागरी जिल्हे सोडून एक जिल्हा परिषद स्थापन करण्यात येते. महाराष्ट्रात जिल्हा परिषदेची स्थापना 1 मे 1962 रोजी करण्यात आली. राज्यात सध्या 36 जिल्हे असून 34 जिल्हा परिषदा आहेत.परिषद ही पंचायतराजमधील महत्त्वाची संस्था असून त्यातील शिखर संस्था म्हणून ओळखली जाते.
1983 : अमरावती विद्यापीठाची स्थापना
तत्कालीन नागपूर विद्यापीठाचे विभाजन करून 1 मे 1983 रोजी अमरावती विद्यापीठाची स्थापना झाली. सुरुवातीला या विद्यापीठाचे नाव अमरावती विद्यापीठ असे होते. नंतर महाराष्टातील थोर संत व समाजसुधारक गाडगेबाबा यांचे नाव या विद्यापिठास देण्यात आले. अमरावती विभागातील अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशिम हे पाच जिल्हे या विद्यापीठाच्या अखत्यारीत येतात.
1998 : कोकण रेल्वे प्रकल्प राष्ट्राला अर्पण Konkan Railway Dedicated to Nation
पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते कोकण रेल्वे प्रकल्प राष्ट्राला अर्पण करण्यात आला. कोकण रेल्वे हा मुंबई व मंगळूर ह्या महत्त्वाच्या बंदरांना जोडणारा भारतीय रेल्वेचा एक मार्ग आहे. भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेल्या कोकण ह्या भौगोलिक प्रदेशामधून धावणारा कोकण रेल्वे मार्ग महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यामधील मध्य रेल्वेवरील रोहा स्थानक येथे सुरू होतो व कर्नाटकातील तोकुर येथे संपतो. 26 जानेवारी 1998 रोजी हा मार्ग खुला करण्यात आला होता. 1 मे 1998 रोजी कोकण रेल्वे राष्ट्राला अर्पण केला.
कोकण रेल्वेचा 740 किमीचा रेल्वे मार्ग बांधणे हे आव्हानात्मक काम होते. या रेल्वे मार्गातील उंचसखल भूभाग, नद्या, अतिवृष्टी इत्यादी कारणांमुळे कोकणामध्ये रेल्वे चालू करण्यात अनेक अडथळे येत होते. रेल्वे वाहतूक उपलब्ध नसल्यामुळे कोकणाचा विकास खुंटण्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. मधू दंडवते, जॉर्ज फर्नांडिस यासारख्या कोकणातील नेत्यांनी केंद्रीय पातळीवर कोकण रेल्वे बांधण्याची मागणी चालू ठेवली. 1966 साली दिवा-पनवेल मार्ग बांधला गेला. पुढे 1986 मध्ये तो रोहापर्यंत वाढवला गेला. त्यानंतर 1990 साली तत्कालीन रेल्वेमंत्री जॉर्ज फर्नान्डिसांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबईमधील सी.बी.डी. बेलापूर येथे मुख्यालय असलेल्या कोकण रेल्वे कॉर्पोरेशन ह्या कंपनीची स्थापना करण्यात आली. ई. श्रीधरन हे कोकण रेल्वे कॉर्पोरेशनचे पहिले अध्यक्ष होते. 15 सप्टेंबर 1990 रोजी रोहा येथे कोकण रेल्वेचा पायाभरणी समारंभ पार पडला.
740 किमी लांबीचा हा मार्ग महाड, रत्नागिरी उत्तर, रत्नागिरी दक्षिण, कुडाळ, पणजी, कारवार व उडुपी ह्या प्रत्येकी 100 किमी लांबीच्या 7 भागांमध्ये विभागण्यात आला. प्रत्येक विभागाचे काम स्वतंत्रपणे सुरू करण्यात आले. परदेशांमधून अद्ययावत बांधकाम तंत्रे वापरणारी यंत्रे बांधकामासाठी मागवली गेली होती. कोकण रेल्वे मार्गाची निर्मिती हे भारतातील अभियांत्रिकी इतिहासातील आव्हानात्मक बाब समजली जाते.