नवी मुंबई : नवी मुंबईत घर घेण्यासाठी तुम्ही जर प्रयत्नशील असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. सिडको म्हणजेच शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र यांच्याकडून नवी मुंबईतील कळंबोली, खारघर आणि घणसोली येथील एकूण 902 घरांसाठी लॉटरी जाहीर करण्यात आली आहे. सिडकोच्या लॉटरीतील ही घरं कळंबोली, खारघर आणि घणसोली यासह व्हॅलीशिल्प, स्वप्नपूर्ती आणि वास्तूविहार सेलीब्रेशन येथील एकूण सिडकोकडून 902 घरांसाठी  सोडत जाहीर करण्यात आली आहे. आज दुपारी 12 वाजल्यापासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात झालेली आहे. सिडकोच्या घरांची किंमत 26 लाखांपासून 2 कोटी रुपयांपर्यंत आहे. सिडकोच्या या योजनेत अर्ज करण्यासाठी ज्या अटी निश्चित करण्यात आलेल्या आहेत त्या माहिती असणं आवश्यक आहे. 


सर्वसाधारण अटी  


1) अर्जदार महाराष्ट्र राज्यात किमान 15 वर्ष वास्तव्यास असावा, यासाठी त्याला अधिवास प्रमाणपत्र सादर करावं लागेल. अर्जदाराचं वय 18 वर्ष पूर्ण असावं.  


2) सिडकोच्या घरासाठी अर्ज एका व्यक्तीच्या किंवा संयुक्त नावाने करता येईल. संयुक्त अर्जामध्ये सहअर्जदार हा केवळ पती/पत्नी असू शकेल. तसेच अर्जदार अविवाहित असल्यास, सहअर्जदार म्हणून आई असू शकते. सहअर्जदार देखील महाराष्ट्रात 15 वर्षांहून अधिक काळ वास्तव्यास असणं आवश्यक आहे.


3) आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील सदनिकांसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराचं वैयक्तिक किंवा कौटुंबीक उत्पन्न 6 लाखांपेक्षा कमी असावं. यासाठी 2023-24 या आर्थिक वर्षातील उत्पन्न ग्राह्य धरलं जाईल. याचा पुरावा म्हणू उत्पन्न प्रमाणपत्र किंवा तहसीलदार यांनी दिलेले उत्पन्न प्रमाणपत्र किंवा आयकर विवरणपत्र सादर करावं लागेल.


4) आरक्षित प्रवर्गातून अर्ज करणाऱ्या अर्जदारांना जातीचा दाखला आणि जात वैधता प्रमाणपत्र सादर करावं लागेल.


5) प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरांसाठी केंद्राच्या http://pmaymis.gov.in या वेबसाइटवर किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेत नोंदणी करणं आवश्यक आहे.अर्जदारांकडे आधार कार्ड देखील असणं आवस्यक आहे. प्रधानमंत्री आवास योजनेचं अडीच लाख रुपये अनुदान मिळेल. ते न मिळाल्यास अर्जदारांकडून वसूल करण्यात येईल.


6)  कुटुंबात प्रौढ महिला असल्यास तिच्या नावानं किंवा पतीसह संयुक्त अर्ज करण्यात यावा.  ज्या कुटुंबात महिला नाही तिथं पुरुषाच्या नावे अर्ज करता येईल. अर्जदार अविवाहित असल्यास शपथपत्र सादर करावं लागेल.  


7 )सर्वसाधारण प्रवर्गातून अर्ज करणाऱ्या अर्जदाराच्या नावे नवी मुंबईत घर नसावं.याबाबतचं प्रतिज्ञापत्र सादर करावं लागेल. या उत्पन्न गटातील अर्जदाराचं उत्पन्न 6 लाखांपेक्षा अधिक असावं.


8)आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक या प्रवर्गातील सिडकोची घरं  पाच वर्षांचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वी विक्री करता येणार नाहीत. पाच वर्षानंतर सिडकोच्या परवानगीनं शुल्क भरुन ज्या प्रवर्गातील घर आहे त्या प्रवर्गातील व्यक्तीला विकता येईल. एकदा मिळालेलं घर विकल्यास पुन्हा त्या व्यक्तीला सिडकोच्या घरांसाठी अर्ज करता येणार नाही.


9) सर्वसाधारण प्रवर्गातील अर्जदाराला घर मिळाल्यास तो पुढील तीन वर्षे विक्री करु शकत नाही. यानंतर  सिडकोच्या परवानगीनं शुल्क भरुन ज्या प्रवर्गातील घर आहे त्या प्रवर्गातील व्यक्तीला विकता येईल. एकदा मिळालेलं घर विकल्यास पुन्हा त्या व्यक्तीला सिडकोच्या घरांसाठी अर्ज करता येणार नाही.


10) सिडकोच्या लॉटरीत अंध किंवा शारीरिक दृष्ट्या अपंग व्यक्ती, राज्य शासकिय कर्मचारी, पत्रकार, प्रकल्पग्रस्त, माजी सैनिक, माथाडी कामगार व सर्व साधारण गट या प्रवर्गातील व्यक्तींसाठी घरं उपलब्ध आहेत.  


संबंधित बातम्या :



Cidco Lottery 2024 : गुड न्यूज, नवी मुंबईत घर घेणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी, 902 घरांसाठी सिडकोकडून लॉटरी, जाणून घ्या घरांची किंमत?