मुंबई : सबसे कातिल गौतमी पाटील म्हणत आपल्या अदांनी महाराष्ट्राला घायाळ करणाऱ्या गौतमी पाटीलला टस्सल देण्यासाठी नवी नृत्यांगणा यंदा मुंबईतील दहीहंडी उत्सवात ठुमके देत आहे. ठाण्यातील मागाठाणे येथील महायुती आणि तारामती चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित मागाठाणे दहीकाला गोविंदोत्सव 2024 येथे राधा मुंबईकरने आपल्या अदांनी प्रेक्षकांना घायाळ केल्याचं पाहायला मिळालं. आमदार प्रकाश सुर्वे यांच्यावतीन आयोजित करण्यात आलेल्या या दहीहंडी महोत्सवात राधाने उपस्थित मुंबईकरांची मने जिंकली. दिलखेचक अदा, चेहऱ्यावरील उत्साह आणि मराठी, हिंदी गाण्यांवर ठुमके देत राधा मुंबईकरने दहीहंडी उत्सवात सेलिब्रिटींनाही मागे टाकल्याचं दिसून आलं. विशेष म्हणजे गतवर्षी गौतमी पाटीलने मुंबई गाजवली होती. यंदा राधाने मुंबईचा दहीहंडी उत्सव गाजवल्याचं पाहायला मिळत आहे.
मुंबईची दहीहंडी (Dahihandi) म्हणजे देशभर चर्चा असते, गोविंदा पथकांचे थरावर थर.. अनेक थर.. आणि लक्षावधी बक्षिसांचेही मनोरे मुंबईत पाहायला मिळतात. मुंबईकरांसाठी दहीहंडीचा दिवस म्हणजे फुल्ल टू एन्जॉय हॉलिडेच असतो. कारण, मुंबईच्या कानाकोपऱ्यातून मुंबईतील ठाणे, घाटकोपर, मुंबई (Mumbai) येथील प्रसिद्ध दहीहंडी पाहायला लोकं येतात. या लोकांच्या मनोरंजनासाठी अनेक सेलिब्रिटीही दहीहंडी उत्सवात असतात. मात्र, गेल्या वर्षीपासून येथील दहीहंडी उत्सवात गौतमी पाटीलची (Gautami patil) एन्ट्री झाली अन् थोडसं मनोरंजन करणाऱ्या सेलिब्रिटींची जागाच लावण्यखणी नृत्यांगणांनी घेतली. गतवर्षी मुंबईत आलेल्या गौतमीने आनंद व्यक्त केला होता. तसेच, मंबईकरांचं हे प्रेम पाहून मी भारावले, यापुढे ही मुंबईत बोलावलं की मी येणार असं तिने म्हटलं होतं. मात्र, यंदा मुंबईतील दहीहंडीत दिसून आली ती राधा मुंबईकर. पाव्हणं तुम्ही या.. यांसह अनेक गाण्यांवर राधा थिरकली. विशेष म्हणजे राधाच्या अगोदर गौतमीही इथेच नाचली होती.
मी मुंबईकर आहे, तुमची मुंबईकर म्हणूनच मी महाराष्ट्रभर फिरताना राधा मुंबईकर हे नाव लावते. मला तुमचा सपोर्ट पाहिजे, मला सपोर्ट करणार का, असे म्हणत ठाण्यातील दहीहंडी उत्सवात राधा पाटील हिने मुंबईकरांचा पाठिंबा मागितला. तसेच, आपण महाराष्ट्रात नक्कीच नंबर १ येणार, असे म्हणत गौतमी पाटीलला फुल्ल खुन्नस दिल्याचं दिसून आलं. भरजरी साडी अन् पाठमोऱ्या दिलखेचक अदांनी राधा मुंबईकरने आज मुबंईत आपल्या चाहत्यांना खुश केलं. तसेच, मुंबईतील चाहत्यांना राधावर फिदा व्हायला भाग पाडलं हेच दिसून आलं.
कोण आहे राधा मुंबईकर
राधा मुंबईकर हिचं खरं नाव राधा पाटील असून ती मूळ मुंबईकर आहे. म्हणूनच ती राधा मुंबईकर या नावाने सांस्कृतिक कार्यक्रम घेते. तिचा जन्म देखील मुंबईचा आहे. राधा मुंबईकर याच नावाने तिचे इंस्टाग्राम अकाऊंटदेखील आहे. सध्या ती गौतमी पाटीलला टक्कर देत पुढे येत आहे. म्हणूनच, गौतमी पाटीलच्या नावाचा वाद पुढे आला तेव्हा राधाने गौतमीवर बोचरी टीका केली होती. ''कलेशी प्रामाणिक राहून नृत्य केलं की नाव होतंच. गौतमी चांगलं नाचते. शेवटी आपण कसा डान्स करायचा ही ज्याची त्याची इच्छा असते. मला दुसऱ्यांच्या आडनावाचं काय माहीत नाही. मी तर खानदानी पाटील आहे. पाटील असल्याचे सगळे पुरावे देऊ शकते,'' अस राधा पाटील हिने म्हटलं होतं.