मुंबई: तस्करी म्हटलं की समोर येतोय तो अफू, चरस आणि गांजाचं मार्केट. या ड्रग्जचा बाजार मोठा आहे आणि चीनमधून याची मोठ्या प्रमाणात तस्करी होताना दिसतेय. पण या नशेच्या पदार्थांव्यतिरिक्त रोजच्या जेवणातील गरजेच्या असणाऱ्या लसणाची तस्करी (Chinese Fake Garlic) होत असल्याचं सागितलं तर कुणाला पटेल का? यावर कुणाचा विश्वास बसो वा नाही, पण भारतीय बाजारपेठेत आता चीनमधील बनावट लसूण विकला जात असल्याचं समोर आलं आहे. 


चीनचा बनावट लसूण भारतीय बाजारपेठेत विकला जात असल्याची माहिती समोर येताच त्यावर भारतीय प्रशासन सतर्क झालंय. चीनमधून बनावट लसनाची ओळख पटवून त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासन काम करत आहे. सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी नेपाळ आणि बांगलादेशच्या सीमा ओलांडून होणारी तस्करी रोखण्यासाठी घाऊक विक्रेते आणि गोदामांवर स्निफर कुत्रे तैनात केले आहेत. तसेच त्यांच्या स्थानिक गुप्तचरांना सतर्क केलं आहे.


यूपी, बिहार आणि ईशान्येकडील राज्यांना धोका


चीनच्या बनावट लसणाची सर्वाधिक विक्री ही बिहार, उत्तर प्रदेश आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये होत असल्याचा अहवाल सांगतोय. या राज्यांमध्ये नेपाळच्या मार्गे हा बनावट लसूण आणला जातोय. सन 2014 मध्ये बुरशीने संक्रमित लसूणाची आयात होत असल्याचं लक्षात आल्यानंतर भारताने चिनी लसणाच्या आयातीवर बंदी घातली होती. फेब्रुवारी महिन्यात सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी 1.35 कोटी रुपये किमतीची 64,000 किलो चीनी लसूण जप्त केला होता.


लसणाच्या भाववाढीमुळे तस्करी


देशांतर्गत बाजारात लसणाच्या किमती वाढल्याने आणि निर्यातीत मोठी वाढ झाल्यामुळे त्याची तस्करी वाढल्याचं अहवालात म्हटलं आहे. या बनावट चीनी लसणाचा साठा 1,000-1,200 टन असल्याचा उद्योग क्षेत्रातील सूत्रांचा अंदाज आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरपासून लसनाचे भाव जवळपास दुपटीने वाढून 450-500 रुपये किलो झाले आहेत. पिकांचे नुकसान आणि पेरणीला होणारा विलंब ही लसणाच्या भाव वाढीमागील प्राथमिक कारणे असल्याचं सांगितलं जातंय.  


बाजारात चीनी बनावट लसनाची विक्री सुरू होताच स्थानिक व्यापाऱ्यांनी हा मुद्दा शासनाकडे मांडला. चीन आणि भारत हे जागतिक लसूण उत्पादक देशांपैकी अग्रेसर देश आहेत. कोविडच्या काळानंतर युरोपियन देश आणि अमेरिकेत भारतीय लसणाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढल्याचं दिसून आलं. 


सन 2022-23 मध्ये भारताची लसूण निर्यात 57,346 टन होती. त्याची एकूण किंमत 246 कोटी रुपये होती. गेल्या आर्थिक वर्षात, एप्रिल-सप्टेंबर या कालावधीत भारताने 277 कोटी रुपयांच्या 56,823 टन लसणाची निर्यात केल्याचं शासकीय आकडेवारी सांगतेय. 


ही बातमी वाचा: