Medicine Prices: : देशभरातील औषधांच्या किंमतीबाबत निर्णय घेणाऱ्या (The National Pharmaceutical Pricing Authority -NPPA) मोठा निर्णय घेतला आहे. मधुमेह आणि उच्च रक्तदाबाच्या औषधांसह 74 औषधांची किरकोळ किंमत निश्चित केली आहे.


21 फेब्रुवारी रोजी झालेल्या प्राधिकरणाच्या 109 व्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला.NPPA ने औषध दर नियंत्रण, आदेश 2013 अंतर्गत औषधांच्या किमती सुधारित आणि निश्चित केल्या असल्याची माहिती पीटीआय या वृत्तसंस्थेने दिली आहे.


NPPA ने 80 अधिसूचित औषधांच्या (NLEM 2022) कमाल मर्यादेच्या किमती देखील सुधारित केल्या आहेत, ज्यामध्ये एपिलेप्सी आणि न्यूट्रोपेनियाच्या उपचारांमध्ये वापरल्या जाणार्‍या औषधांचा समावेश आहे.


याशिवाय, NPPA ने सोडियम व्हॅलप्रोएट (20mg) च्या किमती देखील कमी केल्या आहेत. एका टॅब्लेटची किंमत 3.20 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. याशिवाय, फिलग्रास्टिम इंजेक्शनची (एक कुपी) किंमत 1,034.51 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. याशिवाय, स्टेरॉईड असलेल्या हायड्रोकॉर्टिसोनची किंमत प्रति टॅब्लेट 13.28 रुपये करण्यात आली आहे.


NPPA ला नियंत्रित बल्क औषधांच्या आणि फॉर्म्युलेशनच्या किमती निश्चित करणे अथवा त्यात सुधारणा करणे आणि देशातील औषधांच्या किमती आणि उपलब्धता लागू करणे बंधनकारक आहे. औषधांच्या किंमती या अतिशय वाजवी ठेवण्यासाठी नियंत्रणमुक्त औषधांच्या किमतींवरही लक्ष ठेवते. नियामक प्राधिकरणाकडून औषध (किंमत नियंत्रण) आदेशाच्या तरतुदींची अंमलबजावणी केली जाते. ग्राहकांकडून औषधांसाठी उत्पादकांकडून जादा रक्कम आकारली असल्यास त्याची वसुली करण्याचे कामही सोपविण्यात आले आहे. 


मागील महिन्यातही औषधांचे दर केले होते निश्चित


मागील महिन्यात 128 अॅण्टीबायोटिक्स  आणि अॅण्टीव्हायरल औषधांच्या किंमती निश्चित केल्या होत्या. यामध्ये अमोक्सिसिलिन आणि क्लेव्हुलेनिक ऍसिडचे प्रतिजैविक इंजेक्शन, व्हॅनकोमायसिन, दम्याच्या आजारामध्ये वापरले जाणारे सल्बुटामोल, कर्करोगाचे औषध ट्रॅस्टुझुमॅब, वेदना कमी करणारे आयबुप्रोफेन आणि तापामध्ये दिलेले पॅरासिटामॉल यांचा समावेश आहे.  


मागील महिन्यात काढण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार, Amoxicillin च्या एका कॅप्सूलची किंमत 2.18 रुपये तर Cetirizine ची किंमत 1.68 रुपये निश्चित करण्यात आली आहे. तर, ibuprofen ची 400 mg ची टॅब्लेट कमाल 1.07 रुपये इतकी निश्चित करण्यात आली. 


औषध निर्मितीसाठीच्या कच्च्या मालाच्या दरात वाढ


महागाईने (Inflation) आधीच सामान्यांचे कंबरडे मोडले असताना आता औषधांच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. आधीच आरोग्यावरील खर्च करणे अनेकांना शक्य नसते. त्यातच आता औषधांच्या दरवाढीची टांगती तलवार सामान्यांवर आहे. औषध निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या दरवाढीच्या परिणामी औषधांचा खर्च वाढणार असल्याचे म्हटले जात आहे. 


'टाईम्स ऑफ इंडिया'ने दिलेल्या वृत्तानुसार, कोरोना महासाथीच्या काळापासून ते आतापर्यंत काही औषधांच्या निर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या कच्च्या मालाच्या दरात 100 टक्के वाढ झाली आहे. पुरवठा साखळी आणि लॉजिस्टिक्समध्ये सुधारणा झाल्यानंतरही कच्च्या मालाच्या वाढत्या किंमतीने फार्मा उद्योगांची चिंता वाढवली आहे. चीनमधून आयात केलेल्या अ‍ॅझिथ्रोमायसिन आणि अमोक्सिसिलिनसह हाय वॅल्यूड अॅण्टीबायोटिक औषधांच्या किंमतीत वाढ झाली आहे. काही औषधांसाठी भारताला चीनवर अवलंबून राहावे लागते. जीवनसत्त्वे ब आणि ड सह इतर जीवनसत्त्वांच्या औषधांच्या किंमती देखील चीनमधून आयातीवर अवलंबून असतात. 


इतर महत्त्वाच्या बातम्या :