मुंबई : उसाचा रस, बी-हेवी मेालॅसिस पासून इथेनॉल तयार करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. राज्यातील साखर कारखान्यांना या निर्णयाचा मोठा दिलासा मिळणार आहे. या निर्णयामुळं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्र शासनाचे आभार मानले आहेत. केंद्राच्या या निर्णयाचा फायदा ऊस उत्पादक शेतकरी, साखर कारखाने आणि शेअर बाजारातील साखर निर्मिती कंपन्या यांना फायदा होणार आहे.
केंद्र सरकारनं गेल्या वर्षी म्हणजे डिसेंबरमध्ये इथेनॉल निर्मितीवर निर्बंध आणले होते. हे निर्बंध हटवावेत आणि साखर कारखान्यांना इथेनॉल निर्मितीची परवानगी द्यावी यासंदर्भात वेळोवेळी राज्य सरकारनं आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्र शासनाकडे पाठपुरावा केला होता. राज्य शासनाने केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून केंद्र शासनाने इथेनॅाल निर्मितीवर घातलेले निर्बंध २०२४-२५ गाळप हंगामात उठवले आहेत.
केंद्र शासनाच्या या निर्णयामुळे साखर कारखाने व डिस्टिलरीजना मोठा दिलासा मिळणार आहे .केंद्र शासनाने आज घेतलेल्या निर्णयामुळे आता नव्या हंगामात राज्यातील साखर कारखान्यांना आणि डिस्टिलरीजना उसाचा रस, सिरप, बी हेवी मेालॅसिस पासून इथेनॉल निर्मिती करता येणार आहे.
1 नोव्हेंबरपासून निर्णय लागू होणार
केंद्र सरकारच्यावतीनं 29 ऑगस्टला एक नोटिफिकेशन काढून उसापासून इथेनॉल बनवण्यावरील बंदी पूर्णपणे हटवली आहे. मात्र हा निर्णय 1 नोव्हेंबरपासून लागू होणार आहे. केंद्रानं गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात इथेनॉलवर बंदी घातली होती. त्या निर्णयानंतर विरोधी पक्ष आक्रमक झाले होते. त्यानंतर साखर कारखान्यांना विशिष्ट मर्यादेपर्यंत इथेनॉल निर्मितीला परवानगी देण्यात आलेली होती.
सरकारचा देशात इथेनॉलच्या उत्पादनाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न आहे. भारत सरकारनं इंधनात इथेनॉल मिसळण्यासाठी धोरण ठरवलेलं आहे. त्यानुसार पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळलं जाते. पुढील काळात ते डिझेलमध्ये देखील मिसळलं जाईल. इंधनाच्या आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी हा प्रयत्न केला जात आहे.
इथेनॉल निर्मिती धोरणातील बदलानंतर साखर निर्मिती कंपन्यांच्या स्टॉक्समध्ये तेजी पाहायला मिळाली. या कंपन्यांच्या शेअर्समध्ये 10 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली. अवध शुगर, बजाज हिंदुस्तान शुगर, बलरामपूर साखर, बन्नारी अम्मन शुगर्स, धामपूर शुगर मिल्स या कंपन्याच्या शेअर्समध्ये 8-9 टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याचं पाहायला मिळालं.
इतर बातम्या :
मुंबईच्या म्हाडाच्या सोडतीबाबत मोठी अपडेट, फॉर्म भरणाऱ्यांना घर मिळालं की नाही हे कधी समजणार?