Gautam Adani : आशियातील दुसरे सर्वात श्रीमंत उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) एका नव्या क्षेत्रात पदार्पण करणार आहेत. त्यासाठी त्यांनी 42 हजार कोटींची योजना आखली आहे. यानंतर टाटा (Tata) आणि बिर्ला (Birla) या मोठ्या गटांमध्ये खळबळ उडाली आहे. गेल्या काही वर्षात गौतम अदानी यांनी आपला व्यवसाय वाढवला असून त्यात वैविध्यही आणले आहे. अदानी वेगवेगळ्या क्षेत्रात प्रवेश करत आहे.
आधी सिमेंट, मीडिया आणि नंतर अक्षय ऊर्जा यानंतर आता गौतम अदानी आणखी एका क्षेत्रात पाऊल टाकणार आहेत. ज्यामध्ये पुढील 5 वर्षात 42 हजार कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. यावेळी त्यांची या क्षेत्रातील स्पर्धा मुकेश अंबानींशी नसून टाटा आणि बिर्ला यांच्याशी असणार आहे.
अदानी समूह धातू उद्योगात पदार्पण करणार
अदानी कोणत्या सेक्टरमध्ये 5 अब्ज डॉलर्स म्हणजेच 42 हजार कोटी रुपयांची गुतंवणूक करणार आहेत, याबाबतची माहिती पाहुयात. गौतम अदानी येत्या तीन ते पाच वर्षांत 5 अब्ज डॉलर्स म्हणजेच 42 हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह भारतीय धातू उद्योगात प्रवेश करण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अदानी समूहाचा नैसर्गिक संसाधन विभाग तांबे, लोह आणि पोलाद आणि ॲल्युमिनियमच्या खाणकाम, शुद्धीकरण आणि उत्पादनात गुंतवणूक करेल. समूह तांबे उत्पादनात 2 अब्ज डॉलर आणि इतर धातूंमध्ये 3 अब्ज डॉलर गुंतवण्याची शक्यता आहे.
पायाभूत सुविधांसह इतर व्यवसायांनाही फायदा होणार
अदानींच्या धातू उद्योगात प्रवेश केल्याने समूहाच्या अक्षय ऊर्जा, बंदरे आणि पायाभूत सुविधांसह इतर व्यवसायांनाही फायदा होणार आहे. एका अहवालात दिलेल्या माहितीनुसार, समूहाच्या ग्रीन एनर्जी व्यवसायासाठी स्वतःचे ॲल्युमिनियम असणे महत्त्वाचे आहे. जे समूहाच्या कमी ऊर्जा उत्पादन खर्चात आणि इतरांपेक्षा चांगले विक्री मार्जिन साध्य करण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकते.
मुकेश अंबानी देखील 65000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार
आशिया खंडातील सर्वात मोठे उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) 65,000 कोटी रुपयांची मोठी गुंतवणूक (Investment) करणार आहेत. त्यांची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (Reliance Industries Ltd) आंध्र प्रदेशमध्ये 500 कॉम्प्रेस्ड बायोगॅस संयंत्रे उभारण्यासाठी पुढील 5 वर्षांत 65000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. ही मुकेश अंबानी यांनी ऊर्जा क्षेत्रात केलेली सर्वात मोठी गुंतवणूक आहे. मुकेश अंबानींच्या या गुंतवणुकीमुळं 2 लाख 50 हजार तरुणांना नोकऱ्या मिळणार आहेत.
महत्वाच्या बातम्या: